नागपुरात एअरलाईन्सच्या तणावग्रस्त कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:18 PM2019-05-30T23:18:08+5:302019-05-30T23:19:04+5:30
नागपूर विमानतळावरील गो-एअरलाईन्सच्या एका तणावग्रस्त तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विमानतळावरील गो-एअरलाईन्सच्या एका तणावग्रस्त तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंथन महेंद्र चव्हाण (१९) रा. चंद्रमणीनगर असे मृताचे नाव आहे. तो कस्टमर सर्व्हिस एजंट (सीएसए) म्हणून कामावर होता. कामाच्या टेन्शनमुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. ही घटना गुरुवारी दुपारी २.४५ वाजता घडली. मंथन आजारी होता, तरीही अधिकारी त्याला वारंवार कामावर येण्यास सांगत होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून तणावात होता.
मृत मंथनचे वडील महेंद्र चव्हाण हे शास्त्री चौकातील कीर्ती डायग्नोसिस सेंटरमध्ये एक्स-रे टेक्निशियन आहेत तर आई सुषमा पोलीस विभागात विशेष शाखेत कार्यरत आहे. त्याच्या मित्रानुसार मंथनला नोकरीवर लागून एक वर्ष होत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या दबावामुळे तो नोकरी सोडण्याच्या विचारात होता. त्याला कावीळ झाला होता. त्यामुळे मंथन एक आठवड्यापासून सुटीवर होता. त्याचे मेडिकल रिपोर्टही कंपनीला देण्यात आले होते. यानंतरही त्याला वारंवार ड्युटीवर बोलावले जात असल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांचेही म्हणणे आहे की, तो वैद्यकीय रजेवर असूनही नोकरीच्या टेन्शनबाबत बोलत होता. गुरुवारी दुपारी ३ वाजता मंथन त्याच्या खोलीत फासावर लटकलेला आढळून आला.
सुसाईड नोट सापडले
मंथनच्या मित्रांनुसार तो काही दिवसांपासून नोकरीबाबत खूप त्रस्त होता. याबाबत त्याने आपल्या मित्रांनाही अनेकदा सांगितले होते. त्याने गळफास घेतल्यानंतर त्याच्या खोलीत मंथनने लिहिलेले सुसाईड नोटही सापडले आहे. त्यात त्याने आई सुषमा यांची आत्महत्येसाठी माफी मागितली आहे.