नागपूर विमानतळ देशात सर्वाधिक महागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:24 AM2018-03-27T10:24:24+5:302018-03-27T10:26:30+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘युझर डेव्हलपमेंट फीस’ (यूडीएफ) आणि ‘पॅसेंजर सर्व्हिस फीस’ (पीएसएफ) वसूल करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून वसूल करण्यात येत असलेल्या या शुल्कामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत.

Nagpur airport is the most expensive in the country | नागपूर विमानतळ देशात सर्वाधिक महागडे

नागपूर विमानतळ देशात सर्वाधिक महागडे

Next
ठळक मुद्देसुविधांची कमतरता तरीही ‘यूडीएफ’ जास्त तिकीट दर वाढले, ट्रॅव्हल असोसिएशन नाराज

वसीम कुरेशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रानगरीत आतापर्यंत मिहान प्रकल्प पूर्ण झालेला नाही, विमानतळाचे खासगीकरणही झालेले नाही अन् दुसरी धावपट्टीही तयार झाली नाही. परंतु असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘युझर डेव्हलपमेंट फीस’ (यूडीएफ) आणि ‘पॅसेंजर सर्व्हिस फीस’ (पीएसएफ) वसूल करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून वसूल करण्यात येत असलेल्या या शुल्कामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. आॅल इंडिया ट्रॅव्हल्स असोसिएशननुसार देशातील कोणत्याही विमानतळाच्या तुलनेत नागपूर विमानतळावरील हे शुल्क सर्वात जास्त आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६ डिसेंबर २०१७ पासून ‘यूडीएफ’ लागू करण्यात आला. ट्रॅव्हल असोसिएशननुसार येथे यूडीएफ ४४५ आणि पॅसेंजर सर्व्हिस फीसच्या रूपाने १७५ रुपये म्हणजे एकूण ६१५ रुपये वसूल करण्यात येत आहे. सामान्य रूपाने विमान तिकिटावर हे शुल्क दिसत नाही. एकीकडे शासन देशातील सामान्य नागरिकांना विमानाची सुविधा पुरविण्यावर भर देत असताना दुसरीकडे मात्र विमानतळावर या पद्धतीने अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता कमीच दिसत आहे. हे शुल्क वसूल केल्यानंतर विमानतळावर किती सुविधा वाढविण्यात आल्या, ही माहिती विमानतळ व्यवस्थापन सांगू शकले नाही. परंतु विमानतळाचे संचालन करणारी मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) आणि ट्रॅव्हल असोसिएशनतर्फे ‘यूडीएफ’ची सांगण्यात आलेली रक्कम वेगवेगळी आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा शुल्कांमुळे नागपूरच्या विमानतळावर त्याचा प्रतिकूल परिणाम पडणार आहे.

वाढत आहे नाराजी
आॅल इंडिया ट्रॅव्हल्स असोसिएशनचे कार्यकारी सदस्य गुरमितसिंह विज यांनी सांगितले की, ‘यूडीएफ’ आणि पॅसेंजर सर्व्हिस फीसच्या रूपाने नागपूर विमानतळावर देशातील कोणत्याही विमानतळाच्या तुलनेत सर्वात अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. हे शुल्क सुविधा दिल्यानंतर वसूल करावयास हवे. नागपूर विमानतळावर तर असुविधाच अधिक दिसतात. ते म्हणाले, नागपूर विमानतळावर दररोज जवळपास २८ विमाने येतात. एका विमानात सरासरी १५० प्रवासी यानुसार यूडीएफ आणि ‘पीएसएफ’ मिळून ६१५ रुपये प्रतिप्रवासी या हिशेबाने १६ लाख ५७ हजार रुपयांची वसुली होते. १६ डिसेंबरपासून आतापर्यंत वसूल करण्यात आलेल्या या टॅक्समधून सहा कोटीपेक्षा अधिक रक्कम मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला मिळाली आहे. अशास्थितीत कोणत्या सुविधा विमानतळावर पुरविल्या, हे ‘एमआयएल’ने सांगावयास हवे.’

याचिका दाखल करणार
गुरमितसिंह विज यांच्याशिवाय अ‍ॅड. श्याम देवानी हे सुद्धा नागपूर विमानतळावर या पद्धतीने शुल्क लावण्यात येत असल्यामुळे नाराज आहेत. विज यांच्या मते, देशात विमानतळांचे संचालन करणाऱ्या काही खासगी कंपन्या जीएमआर आणि जीव्हीके इतके शुल्क घेत नाही. देवानी यांनी सांगितले की, याबाबत ते एक जनहित याचिका दाखल करणार आहेत. त्यांच्या मते, विमानतळावर अनेक कमतरता आहे, त्या दूर करण्याची गरज आहे. तर विज यांच्या मते, विमानतळाच्या आत टॉयलेटची कमतरता आहे. तेथे सफाईअभावी दुर्गंधी पसरलेली असते. मागील अनेक वर्षांपासून काऊंटरही वाढविण्यात आलेले नाहीत. अशास्थितीत विमानतळ व्यवस्थापन हे शुल्क कसे घेऊ शकते?

काय म्हणतात विमानतळ संचालक...
‘बोर्डाने एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलॅरिटी अ‍ॅथॉरिटीला (एरा) विमानतळावर सुविधांबाबत केलेला खर्च दाखविला. त्यानंतरच ‘यूडीएफ’साठी मंजुरी घेण्यात आली. घरगुती उड्डाणांसाठी ३२७ रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी २७७ रुपये शुल्क आहे. ही रक्कम विमानतळाच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येते. जर कुणी सुविधा कमी आहे असे म्हणत असल्यास आम्हाला त्यांनी सूचना देऊन कोणत्या सुविधा नाहीत, हे स्पष्ट सांगावे’
-विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, ‘एमआयएल’

Web Title: Nagpur airport is the most expensive in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.