नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:48 AM2020-07-10T08:48:09+5:302020-07-10T08:48:40+5:30

सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

Nagpur Airport; Re-carpeting of runway to be done again | नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

नागपूर विमानतळ; पुन्हा करावे लागणार धावपट्टीचे ‘रि-कार्पेटिंग’

googlenewsNext
ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर दिला होता थर

वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नव्याने थर (रि-कार्पेटिंग) द्यावा लागणार आहे. सहा वर्षांपूर्वी धावपट्टीवर थर दिला होता. पण आता कालावधी संपल्याने हे काम पुन्हा करावे लागणार आहे. लॉकडाऊनमुळे धावपट्टीवर विमानांची ये-जा कमी असल्याने आता धावपट्टीवर थर दिल्याविना काम चालणार आहे.

उल्लेखनीय असे की, जुलै २०१३ मध्ये धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू झाले होते. जून २०१४ मध्ये काम पूर्ण झाले. या कामासाठी मिहान इंडिया लिमिटेडने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) २७.५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. एएआयने या कामाचे कंत्राट नागपुरातील गुरुबक्शानी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. कंत्राटदार कंपनीचे डीपीएल (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) तीन वर्षांचे होते. अर्थात या तीन वर्षांत धावपट्टी खराब झाल्यास दुरुस्ती या कंपनीला करावी लागणार होती. जून २०१७ नंतर कंपनीने दुरुस्तीचे काम केले नाही.
गेल्या दोन वर्षांपासून नागपुरातून काही विमान कंपन्यांनी संचालन बंद केले आहे आणि उपलब्ध विमान कंपन्यांची विमाने मर्यादित संख्येत आहेत. लॉकडाऊननंतर उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सध्या काही विमाने सुरू झाली आहेत. पण त्यामुळे विमानतळाला महसूल मिळेल एवढी विमानांची संख्या नाही. अशा स्थितीत मोठ्या गुंतवणुकीतून धावपट्टीवर थर टाकण्याचे काम विमानतळ व्यवस्थापनाला आव्हानात्मक ठरणार आहे.

सन २०१४ पूर्वी धावपट्टीची स्थिती खराब झाली होती. त्याच्याशी जुळलेल्या तक्रारी येत होत्या. दबाव वाढल्यानंतर धावपट्टीच्या रि-कॉर्पेटिंगचे काम सुरू करण्यात आले. जून २०२० जाताच धावपट्टीवर थर टाकण्याच्या कामाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. कंत्राटदार कंपनीच्या देखरेखीची जबाबदारी तीन वर्षांपूर्वीच संपली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील एक वा दोन वर्षे धावपट्टीच्या रि-कार्पेटिंगचे काम सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आवश्यकता भासल्यास योग्य निर्णय घेणार
सध्या धावपट्टीचा थर उत्तम स्थितीत आहे. आवश्यकता भासल्यास धावपट्टीचे रि-कार्पेटिंग करण्याच्या दिशेने योग्य पावले उचलण्यात येईल.
आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.
 

 

Web Title: Nagpur Airport; Re-carpeting of runway to be done again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.