आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 12, 2024 08:52 PM2024-03-12T20:52:53+5:302024-03-12T20:53:09+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरण कंत्राटदार व वेळापत्रक एप्रिलमध्ये जाहीर करणार

Nagpur airport runway will now be 'recarpeted' | आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’

आता नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे होणार ‘रिकार्पेटिंग’

नागपूर : तब्बल दहा वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘रिकार्पेेटिंग’ अर्थात धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर थर टाकण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

‘रिकार्पेटिंग’ची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची उपकंपनी मिहान इंडिया लिमिटेडने (एलआयएल) भारतीय विमानतळ प्राधिकरणावर (एएआय) सोपविली आहे. त्यानुसार एएआय निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराचा शोध घेऊन तारीख निश्चित करणार आहे. या प्रक्रियेवर एप्रिल महिन्यात शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. दहा वर्षांनंतर कोणत्याही विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर पुन्हा थर टाकण्यात येते. याची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविण्यात येते. त्यानुसार नागपूर विमानतळाचे नूतनीकरण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जानेवारीत झालेल्या एका बैठकीत एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी हे कार्य एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्याचे सुतोवाच केले होते.

निविदा प्रक्रिया सुरू
नागपूर विमानतळाची दुरुस्ती आणि धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी दुपारी १.३० ते ३.३० हा वेळ राखीव आहे. कारण या वेळेत कोणत्याही विमानाची ये-जा नसते. रिकार्पेटिंगसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. हे कार्य कोणती कंपनी करेल, किती खर्च येईल आणि किती वेळ लागेल, याची माहिती प्रक्रियेच्या पूर्णत्वानंतरच कळणार आहे.

दहा वर्षांत होते रिकार्पेटिंग
धावपट्टीची दुरुस्ती आणि त्यावर नव्याने थर टाकण्याचे कार्य दहा वर्षांनी करण्यात येते. हे कार्य करीत असताना विमान सेवेवर परिणाम होतो. विमानाचे लॅण्डिंग आणि टेक-ऑफवर मर्यादा येतात. हे कार्य करीत असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते.

रिकार्पेटिंगचे कार्य एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

Web Title: Nagpur airport runway will now be 'recarpeted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर