नागपूर विमानतळ ‘जीएमआर’कडे : पाच कंपन्यांच्या आल्या होत्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:42 PM2018-10-01T23:42:50+5:302018-10-01T23:44:28+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर निघाला आहे. वित्तीय निविदेच्या आधारावर ‘जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीकडे विमानतळाच्या विकासाचा ताबा देण्यात येणार आहे. साधारणत: पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल व विमानतळाच्या विकासाची सूत्रे ‘जीएमआर’कडे सोपविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २००९ मध्ये नागपूर विमानतळ ‘एएआय’कडून ‘एमएडीसी’कडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत खासगीकरण अडकले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर निघाला आहे. वित्तीय निविदेच्या आधारावर ‘जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीकडे विमानतळाच्या विकासाचा ताबा देण्यात येणार आहे. साधारणत: पुढील महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल व विमानतळाच्या विकासाची सूत्रे ‘जीएमआर’कडे सोपविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २००९ मध्ये नागपूर विमानतळ ‘एएआय’कडून ‘एमएडीसी’कडे हस्तांतरित झाल्यानंतर आतापर्यंत खासगीकरण अडकले होते.
जून २००६ मध्ये संयुक्त कंपनी मिहान इंडिया लिमिटेडची नोंदणी झाली आणि आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएलने विमानतळ संचालनाची जबाबदारी सांभाळली. जवळपास आठ वर्षांनंतर गेल्या वर्षी ‘आरएफक्यू’ (रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन) निविदा काढण्यात आल्या. पूर्वप्रक्रियेत पात्र भागीदारांमध्ये ‘जीव्हीके’, ‘जीएमआर’, ‘टाटा रियल्टी’, ‘एस्सेल इन्फ्रा’, ‘पीएनसी इन्फ्रा’ इत्यादी कंपन्यांचा समावेश होता, तर अंतिम निविदेसाठी ‘जीएमआर’ व ‘जीव्हीके’मध्ये स्पर्धा होती. वित्तीय निविदेच्या आधारावर विमानतळाला सर्वाधिक महसूल देणारी कंपनी म्हणून ‘जीएमआर’ला कंत्राट देण्यात आले. ‘पीपीपी’वर आधारित असलेल्या खासगीकरणाची प्रक्रिया एक महिना चालणार असून, त्यानंतरच विमानतळ ‘जीएमआर’कडे हस्तांतरित होणार आहे. ही प्रक्रिया ‘एमआयएल’च्या (मिहान इंडिया लिमिटेड) माध्यमातून राबविण्यात येत आहे. खासगीकरणानंतर नागपूर विमानतळ सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर उभारण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या विमानतळावर जवळपास २० विमाने राहण्याची क्षमता आहे. विकासानंतर त्याची क्षमता वाढणार आहे.
‘जीएमआर’ची ७४ टक्के भागीदारी
विमानतळ विकासासाठी निवड झालेली ‘जीएमआर’ कंपनी आणि ‘एमआयएल’ यांची विशेष कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. १६८५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात निवड झालेल्या ‘जीएमआर’ची ७४ टक्के आणि ‘एमआयएल’ची २६ टक्के भागीदारी राहील. खासगीकरणात आमची निवड झाली, ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न असेल. शिवाय या माध्यमातून विदर्भाच्या विकासासाठीदेखील आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत ‘जीएमआर’चे चेअरमन जी.बी.एस.राजू यांनी व्यक्त केले.
नवीन ‘टर्मिनल’ बांधण्याचे आव्हान
खासगीकरणाच्या प्रकल्पात ३० वर्षांसाठी विमानतळाचे आधुनिकीकरण, संचालन आणि देखरेख यांचा समावेश राहणार आहे. सोबतच नवीन ‘टर्मिनल’ इमारत बांधण्याच्या कामाचादेखील यात समावेश आहे. ‘जीएमआर’कडे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह हैदराबाद, फिलिपिन्स, ग्रीस इत्यादी ठिकाणच्या विमानतळांच्या देखरेख व संचालनाची जबाबदारी आहे.
काय आहे नागपूर विमानतळाची क्षमता
-२०१७-१८ मध्ये नागपूर विमातळावर २१ लाख ८० हजार प्रवासी आले तर ७८०० मेट्रिक टन ‘कार्गो’ उतरले. मागील पाच वर्षांत प्रवासी वाहतूक ११ टक्क्यांनी वाढली आहे. देशात नागपूर विमानतळाचा ‘कार्गो’ प्रवासाच्या दृष्टीने १७ वा क्रमांक लागतो.