नागपुरातील विमानसेवा अधिक सक्षम करणार
By admin | Published: May 16, 2015 02:26 AM2015-05-16T02:26:56+5:302015-05-16T02:26:56+5:30
उपराजधानी नागपूरमधील विमानसेवा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
नागपूर: उपराजधानी नागपूरमधील विमानसेवा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. विविध विमान कंपन्यांशी चर्चा करून येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नागपूरला महत्त्व प्राप्त झाल्याने देश-विदेशातील नागरिकांची येथे वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या विमानसेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. यादृष्टीने गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूरला येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांच्या कंपन्यांना गडकरी यांनी एक पत्र पाठविले असून त्यांना यासंदर्भात विचार आणि सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागपूरमध्ये मिहान प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. आयआयटी, एम्स यासारख्या संस्था येथे येत आहेत.
त्यामुळे देश-विदेशातील नागरिकांचे येथे येणे-जाणे सुरू होईल. भविष्यातील हे चित्र लक्षात घेता विमान सेवांची संख्या वाढविण्याकडे गडकरी यांचा कल राहणार आहे. नागपूरमधून आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील असून कंपन्यांकडून सूचना आल्यावर यासंदर्भात एक बैठक गडकरी घेणार आहे. (प्रतिनिधी)