Nagpur: दुर्देवी! थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली, दोन भावंडाचा होरपळून मृत्यू
By योगेश पांडे | Published: January 19, 2024 12:18 AM2024-01-19T00:18:15+5:302024-01-19T00:18:31+5:30
Nagpur News: एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली.
- योगेश पांडे
नागपूर - एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाड येथील गोविंद गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्देवी घटना घडली. घरात ज्यावेळी आग लागली तेव्हा तेथे त्यांची मोठी बहीणदेखील होती. तिचा जीव वाचला मात्र दोन भावांचे डोळे नेहमीसाठी मिटले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
देवांश रंजित उईके (७) व प्रभास उईके (३) अशी मृत भावंडांची नावे आहे. ते त्यांची आई दिपाली हिच्यासोबत एका कच्च्या घरात रहायचे. त्यांना एक मोठा भाऊ व १० वर्षीय बहीणदेखील आहे. आई दिपाली कामानिमित्त बाहेर गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री थंडी असल्यामुळे मुलांनी घरात शेकोटी पेटवली. मात्र त्यामुळे घरात आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. घर वस्तीपासून काहीसे बाजुला असल्याने चिमुकल्यांचा आरडाओरडा लोकांना ऐकूदेखील गेला नाही. त्यांच्या बहिणीने कसाबसा बाहेर पळ काढला. मात्र देवांश व प्रभास हे आगीच्या विळख्यात सापडले. काही वेळातच त्यांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने धाव घेतली असता हा प्रकार लक्षात आला. अग्निशमन विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. उपायुक्त राहुल मदने, गिट्टीखदानचे ठाणेदार महेश सांगळे, हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते.