नागपूरलाही डेल्टा व्हेरियंटचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:10+5:302021-06-26T04:07:10+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचाी दुसरी लाट ओसरली आहे. जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जात आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा नवीन ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचाी दुसरी लाट ओसरली आहे. जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जात आहे तर दुसरीकडे, कोरोनाचा नवीन ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ने चिंता वाढवली आहे. अधिक संसर्गजन्य असलेल्या या व्हेरियंटचा तूर्तास तरी नागपूर जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. परंतु शेजारच्या मध्य प्रदेशात या व्हेरियंटचे सात रुग्ण व एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्ण नागपुरात उपचारासाठी येतात. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत एकट्या मेडिकलमध्ये मध्य प्रदेशातील ६९ कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. सध्यातरी डेल्टाला घेऊन कुठेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. यामुळे या व्हेरियंटचा धोका नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भाला बसण्याची दाट शक्यता आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंट जगभरात फैलावत असून ८५ देशांमध्ये आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोनाचा या नव्या विषाणूचा प्रकाराला घेऊन इशाराही दिला आहे. या ‘व्हेरियंट’चा संसर्गाचा दर कायम राहिल्यास कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक वर्चस्व निर्माण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या साप्ताहिक अहवालात डेल्टा व्हेरियंट ८५ देशांमध्ये आढळला आहे. महाराष्टÑात डेल्टा व्हेरियंटचे २१ रुग्ण आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे रत्नागिरी जिल्हात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकताच याला दुजोराही दिला आहे.
-मध्य प्रदेशातील ६९ बाधितांचा नागपुरात मृत्यू
कोरोनाचा दुसऱ्या लाटेच्या दरम्यान शेजारील राज्यातून शेकडो रुग्ण नागपुरात उपचारासाठी आले. यातील मध्य प्रदेशातील ६९, छत्तीसगड येथील ५, उत्तर प्रदेशातील ३, झारखंड येथील ३ तर बिहार येथील १ रुग्ण असे एकूण ८१ रुग्णांचा उपचारादरम्यान एकट्या मेडिकलमध्ये मृत्यू झाले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
-केवळ नमुने घेण्यावरच भर
डेल्ट व्हेरियंट विषाणूचे निदान करण्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेला दर १५ दिवसांनी कोरोनाबाधितांचे १५ नमुने पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्याचा सूचना आहेत. मागील महिन्यापासून ते आतापर्यंत जवळपास ४५ नमुने पाठविण्यात आले, परंतु एकाचाही अहवाल प्रयोगशाळेला प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे.
-जिल्हाबाहेरील प्रवाशांना आयसोलेशन करावे
शेजारच्या राज्यासोबतच इतर जिल्हातून येणाऱ्यांची कोरोना तपासणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवायला हवे. यातील गंभीर रुग्णांची ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करून त्याचा तातडीने अहवाल प्राप्त व्हायला हवा. यामुळे डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग पसरण्यावर काही प्रमाणात नियंत्रण येईल. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत नागपुरात झालेल्या उद्रेकाला काही प्रमाणात जिल्हाबाहेरील व इतर राज्यातील रुग्ण जबाबदार आहेत. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आतापासून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग मेडिकल
:: इतर राज्यातील ८१ बाधितांचा नागपुरात मृत्यू
(जानेवारी ते मे २०२१पर्यंत )
राज्य : मृत्यू
मध्यप्रदेश :६९
छत्तीसगड : ५
उत्तर प्रदेश :३
झारखंड : ३
बिहार : १