Nagpur: नक्षल्यांच्या गुहेतील 'अँबूश', जिवाचा थरकाप अन् मुख्यमंत्र्यांची काैतुकाची थाप
By नरेश डोंगरे | Published: November 17, 2023 07:40 PM2023-11-17T19:40:00+5:302023-11-17T19:40:37+5:30
Nagpur: नक्षलवाद्यांच्या गुहेकडचा मार्ग. वेळ रात्री सात साडेसातची. मुख्यमंत्र्यांचा ताफा रात्रीच्या किर्र अंधाराला चिरत पुढे जात असतो. अचानक अँबूश (नक्षल्यांनी जवानांसाठी लावलेला मृत्यूचा सापळा) लावून असल्याचे ध्यानात आल्याने जिगरबाज जवान धडधड धडधड वाहनातून उतरतात आणि अँबूश तोडून पुढे निघतात.
- नरेश डोंगरे
नागपूर - नक्षलवाद्यांच्या गुहेकडचा मार्ग. वेळ रात्री सात साडेसातची. मुख्यमंत्र्यांचा ताफा रात्रीच्या किर्र अंधाराला चिरत पुढे जात असतो. अचानक अँबूश (नक्षल्यांनी जवानांसाठी लावलेला मृत्यूचा सापळा) लावून असल्याचे ध्यानात आल्याने जिगरबाज जवान धडधड धडधड वाहनातून उतरतात आणि अँबूश तोडून पुढे निघतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा सर्व थरार स्वत: बघतात, अनुभवतात अन् रात्रंदिवस निधड्या छातीने नक्षल्यांसोबत दोन हात करणाऱ्या पोलीस जवानांच्या पाठीवर काैतुकाची थाप ठेवतात.
सुरक्षा यंत्रणांची काही वेळेसाठी तारांबळ उडवून देणारा हा थरारक प्रसंग आहे, बुधवारी रात्रीचा. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव तसेच पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात गेले होते. तेथे त्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन आदिवासी बांधव आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. नक्षल्यांची गुहा म्हणूनही ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील किटाळी येथे पोलिसांचे कमांडो ट्रेनिंग सेंटर आहे. येथे भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे निघाले.
त्यांच्यासोबत गोंदिया - गडचिराेली परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलाेत्पल, सीआरपीएफचे कमांडंट परविंदरसिंह आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सशस्त्र पोलिसांचा मोठा ताफा होता. नक्षलवाद्यांकडून पोलिसांच्या मार्गात भू-सुरूंगात स्फोटके पेरून शक्तीशाली स्फोट घडवून आणला जातो. सुरक्षा यंत्रणा या घातपाताला 'अँबूश' म्हणतात. अनेकदा नक्षल्यांनी अँबूशच्या रुपात लावलेला मृत्यूचा सापळा पोलिसांच्या लक्षातच येत नाही अन् घात होतो. मात्र, अलिकडे रात्रंदिवस नक्षल्यांशी सामना होत असल्याने बरेचदा अँबूश लागून असल्याचे पोलीस हेरतात आणि नंतर जमिनीत पुरविलेली स्फोटके बाहेर काढून, निकामी करून अँबूश सोडविला जातो.
अँबूश सोडविण्याचे काम खुपच खतरनाक असते. जराही चूक झाली की अनेकांच्या देहाच्या चिंधड्या उडू शकतात. हे जाणून असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी अँबूश सोडविण्याचे प्रात्यक्षिक बघण्याची ईच्छा व्यक्त केली. यावेळी वेळ होती रात्री ७ ते ७.३० ची. थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे डीआयजी संदीप पाटील यांनी 'अँबूश डेमॉस्ट्रेशन'ची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, जमिनीत पेरलेली स्फोटके कशी शोधली जातात आणि ती कशी निकामी केली जातात, याचे प्रात्यक्षिक गडचिरोलीतील जवानांनी करून दाखविले. अँबूशचे प्रत्येक बारकावे मुख्यमंत्र्यांनी बघितले आणि नेहमीच अशा प्रकारचे जिवावर उदार होणारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मुक्तकंठाने काैतुक केले.
वेपन्स हाताळले !
अलिकडे नक्षलवादी वॉकीटॉकी, ड्रोनचा वापर करू लागले असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रही आले आहेत. त्या आधारे पोलिसांना जंगलातील खिंडित गाठून ते अचानक अंधाधुंद गोळीबार करतात. गडचिरोलीच्या जंगलात हा प्रकार नेहमीच चालतो. त्यामुळे नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांकडे कोणते जॅकेट, कोणती शस्त्रे आहेत, त्याचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. नव्हे, त्यांनी हे जॅकेट घालून बघितले आणि शस्त्रही (वेपन्स) हाताळले.