Nagpur: स्वस्तात गुप्तधनाच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला ३ लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: August 21, 2024 04:55 PM2024-08-21T16:55:26+5:302024-08-21T16:55:41+5:30
Nagpur News: स्वस्तात गुप्तधन देण्याच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
- योगेश पांडे
नागपूर - स्वस्तात गुप्तधन देण्याच्या नावाखाली अमरावतीच्या दांपत्याला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुरेश गुल्हाने व शुभांगी गुल्हाने (नांदगाव, खंडेश्वर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या दांपत्याचे नाव आहे. ते नांदगावमध्ये भाजीपाल्याचे दुकान चालवितात. २३ जुलै रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या दुकानात दोन व्यक्ती आले. ते मजूर होते व त्यांना खोदकामादरम्यान अमरावतीतील राजापेठ येथे सोन्याच्या माळा असलेला हंडा मिळाल्याची त्यांनी बतावणी केली. ठेकेदाराला कळाले तर तो आम्हाला काहीच देणार नाही. ते सोने घरी लग्न असल्याने विकायचे आहे असे सांगुन दोघांनी सोन्याचे दोन मणी सुरेश यांना दिले. त्यांनी त्यांना मोबाईल क्रमांकदेखील दिला. ते सोने त्यांनी पाच ते सात लाखात देण्याचे कबूल केले. काही दिवसांनी ९११२२८९२३५ या क्रमांकावरून अशोक कराडे नावाच्या व्यक्तीने सुरेश यांना फोन केला व ठेकेदाराने नागपुरला कामासाठी नेल्याचे सांगितले. त्याने लवकरात लवकर सोने घेऊन जाण्याबाबत म्हटले.
३० जुलै रोजी गुल्हाने दांपत्य नागपुरात आले व कॉटन मार्केट परिसरात थांबले. तेथे आरोपी आला व त्याने त्यांना उदापुरे ज्वेलर्सच्या बाजुला असलेल्या हनुमान मंदिरात नेले. तेथे आरोपीसह एक महिला व आणखी एक सहकारी होती. त्यांनी लाल कापडात बांधलेले पिवळया धातुचे मणी असलेल्या माळ दाखविल्या. सुरेश यांनी त्यांना ३ लाख रूपये दिले. कॅमेरे लागल्याचे सांगत आरोपींनी त्यांना तेथून लगेच जाण्यास सांगितले. गुल्हाने दांपत्य अमरावतीला परतले व पाच दिवसांनी सोनाराकडे माळ घेऊन गेले. तेव्हा ती बनावट असल्याची बाब समोर आली. गुल्हाने यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.