नागपूर- अमरावती महामार्गावरील सातनवरीत पेपर मिलला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:25 AM2018-03-05T10:25:34+5:302018-03-05T10:25:43+5:30
नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला. सुदैवाने या आगीत कोणत्याही कर्मचारी अथवा कामगाराला दुखापत झाली नाही. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी आग विझविण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
सातनवरी शिवारातील इंड्स पेपर मिलमध्ये ‘टिशू पेपर, किचन टॉवेल व टॉयलेट’चे उत्पादन केले जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिका व युरोपियन राष्ट्रांमधून आयात केला जातो. मिल ओशीगाम ग्रुपच्या मालकीची आहे. या कच्च्या मालाचे बंडल कंपनीच्या गोदाम आणि आवारात साठवून ठेवले होते. दरम्यान, दुपारी २.१५ च्या सुमारास आवारात ठेवण्यात आलेल्या पेपरच्या बंडलने पेट घेतला आणि ही आग अल्पावधीतच पसरत गेली.
ही आग सुरक्षा कर्मचारी नीलेश मडके यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत आग विझविण्यासाठी आवारातील फायर पॉर्इंट सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच नजीकच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतील अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर नगर परिषद व नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. मात्र, आग नियंत्रणात आली नाही.
२०० कामगार व कर्मचारी सुरक्षित
या कंपनीतील सकाळची पाळी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असते. या पाळीत कंपनीमध्ये एकूण २०० कामगार व कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यात महिला कामगारांचाही समावेश होता. कंपनीच्या आवारात आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कार्यात कामगार आतातायीपणा करणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.
आवारात २,५०० टन माल
या कंपनीच्या आवारात २,५०० टन कच्चा माल ठेवला होता. तो सर्व परदेशातून आयात केला होता. या मालाची किंमत प्रति टन ३५ हजार रुपये आहे. आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे आग विझल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक विजय शर्मा यांनी दिली. या कंपनीत रोज ४० टन कागदाचे उत्पादन केले जाते, अशी माहिती कंपनीचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली.
अग्निशमन दलाचा जवान जखमी
हिंगणा एमआयडीसी अग्निशमन दलाचा जवान सचिन उकरे हा आग विझविण्याचे कार्य करीत होता. त्यातच पाण्याच्या दाबामुळे नोझल व पाईप त्याच्या हातातून सुटला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. या ठिकाणी कळमेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील काबडी व शुभांगी ढगे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय, एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली.