Nagpur: एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न, सर्व्हेलन्स टीमच्या ‘अलर्टनेस’मुळे वाचली चोरी
By योगेश पांडे | Published: January 19, 2024 11:34 PM2024-01-19T23:34:57+5:302024-01-19T23:35:29+5:30
Nagpur Crime : देवनगर परिसरातील एका बॅंकेच्या एटीएमची समोरील प्लेट उघडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅंकेच्या सर्व्हेलन्स पथकाच्या समयसूचकतेमुळे चोरी टळली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
- योगेश पांडे
नागपूर - देवनगर परिसरातील एका बॅंकेच्या एटीएमची समोरील प्लेट उघडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅंकेच्या सर्व्हेलन्स पथकाच्या समयसूचकतेमुळे चोरी टळली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
देवनगरात बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून शेजारीच एटीएम आहे. गुरुवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम एटीएममध्ये शिरले. त्यांनी अगोदर स्वत:च्या कार्डमधून पैसे काढले. त्यानंतर एका व्यक्तीने एटीएमचे ‘हूड’ उघडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब सर्व्हेलन्स पथकाच्या लक्षात आली. याची माहिती लगेच बॅंकेचे व्यवस्थापक शीतल मेश्राम यांना देण्यात आली. मेश्राम यांनी धंतोली पोलीस ठाण्यात हा प्रकार कळविला. तसेच सर्व्हेलन्स पथकाने समयसूचकता दाखवत एटीएमचे व्यवहार बंद केले. तीन व्यक्तींनी एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची बाब सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली. मेश्राम यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.