असा आहे नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:05 AM2019-03-11T10:05:57+5:302019-03-11T10:06:28+5:30
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे, नागपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे, नागपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर दक्षिण- पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी कामठी विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. मात्र, पुनर्रचनेत कामठी मतदारसंघ रामटेक लोकसभेला जोडण्यात आला व नागपूर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे पश्चिम व दक्षिण-पश्चिम असे दोन विधानसभा मतदारसंघ करण्यात आले होते. नागपूर महापालिकेतील १५१ नगरसेवक या अंतर्गत येतात. दाट वस्तीचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.
एकेकाळी देशाच्या माजी पंतप्रधानांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेला हा विदर्भातील लक्षवेधी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक हे सहा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतात. १९७७ ते २०१४ या ३७ वर्षातील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठ वेळा काँग्रेस पक्षाच्या आणि चार वेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. १९९९, २००४ मध्ये तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेत शिवसेनेच्या सुबोध मोहित्यांनी रामटेकचा गड सर केला होता. नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर व काँग्रेस प्रवेशामुळे त्यांचे जे समर्थक आमदार, खासदार होते त्यापैकी सुबोध मोहित्यांनी २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला व एप्रिल २००७ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिवसनेचे प्रकाश जाधव यांनी ३२ हजार ५७२ हजार मतांनी मोहिते यांचा पराभव केला. या निवडणुकीत माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी बंडखोरी करीत ७९,६३८ मते मिळविली. देशमुख यांची बंडखोरी व मोहिते यांच्या पक्षांतराला मतदारांनी नापसंती दर्शविली होती. यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर तुमाने यांनी पुन्हा एकदा भगवा फडकविला. यावेळी रामटेकचा गड सर करण्यात कुणाला यश येते व कुणाचा कडेलोट होतो, याकडे वैदर्भीय जनतेचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचा गड भाजपाने दोनदा भेदला
१९५७च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दोन वेळा भाजपने काँग्रेसला दणका दिलेला आहे. यामध्ये एकदा १९९६ च्या निवडणुकीत, तर दुस-यांदा २०१४च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने खेचून आणला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने दहा वेळा आपला खासदार लोकसभेत पाठवला आहे. याशिवाय विदर्भाच्या विभाजनासाठी आग्रही असणारे जांबुवंतराव धोटे यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. काँग्रेसचे दत्ता मेघे, विलास मुत्तेमवार यांच्यासह भाजपच्या बनवारीलाल पुरोहित आणि नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ ढासळला. मात्र, विलास मुत्तेमवार यांच्या रुपात नागपूरची एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती.