नागपूरसह विदर्भाला उष्ण लाटांच्या झळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:27 AM2023-06-12T10:27:07+5:302023-06-12T10:28:36+5:30
सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत अधिक
नागपूर : उष्ण लाटांच्या झळांनी नागपूरसह विदर्भातील नागरिकांना रविवारीही चांगलेच सतावले. २४ तासात कमाल तापमान अंशत: कमी झाले असले तरी सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांपर्यंत अधिक आहे. त्यामुळे हवामान विभागाने विदर्भात उष्ण लाटांचा इशारा जाहीर केला. विभागानुसार साेमवारीही या झळा नागरिकांना बसणार आहेत.
मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्याचे हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. अरबी समुद्रात घाेंगावणारे ‘बिपरजाॅय’ वादळ साैराष्ट्रकडे वळल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वादळाचा मुंबईसह काेकण, खान्देश, नाशिकमध्ये वेगवान वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भाला मात्र काही दिवस तरी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. रविवारी नागपुरात ४२.६ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक आहे. रात्रीचे तापमानही २८.४ अंशांवर पाेहोचले आहे. सर्वाधिक ४३.५ अंश तापमान वर्धा येथे हाेते, जे सरासरीपेक्षा ५ अंशांनी अधिक आहे. त्याखालाेखाल ब्रह्मपुरीला ४३ अंश तापमानाची नाेंद झाली. अमरावतीत ४१.८ अंश पारा सरासरीहून ५ अंशांनी जास्त आहे.
उष्णतेच्या झळांसह दमट वातावरणाचा त्रास रविवारीही कायम हाेता. जाणवणाऱ्या अत्याधिक उष्णतेमुळे लाेकांची चिडचिड हाेत हाेती. पुढचे काही दिवस ढगाळ वातावरणासह उन्हाचा त्रास कायम राहणार आहे. १३ व १४ जूनला विजांच्या कडकडाटासह वादळी परिस्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज वेधशाळेने दिला आहे.