नागपुरात संतप्त प्रवाशांनी संत्रागाछी एक्स्प्रेस पाऊण तास रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:29 PM2018-03-01T22:29:45+5:302018-03-01T22:29:56+5:30
कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली.
रेल्वेगाडी क्रमांक १२७६८ हुजूर साहेब नांदेड-संत्रागाछी एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर सकाळी ९.०५ वाजता पोहोचली. या गाडीच्या एस-६ या कोचमधील पाणी संपले होते. याशिवाय कोचमध्ये खूप कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली होती. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच प्रवाशांनी त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ९.३० वाजता गाडी पुढील प्रवासाला निघाली असता प्रवाशांनी चेनपुलिंग केली. गाडीतील कचरा साफ करून पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याचा पावित्रा प्रवाशांनी घेऊन तब्बल आठवेळा चेनपुलिंग करीत गोंधळ घातला. प्रवासी संतापल्याचे पाहून रेल्वेचे अधिकारी आणि आरपीएफ जवान प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली आणि त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.