नागपुरात संतप्त नागरिकांनी केला शांतिनगर पोलीस ठाण्याचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:23 AM2019-02-21T00:23:14+5:302019-02-21T00:24:01+5:30
शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला.
गेल्या १७ फेब्रुवारी रोजी रात्री शांतिनगर येथील नालंदा चौकात गुन्हेगार ओमप्रकाश ऊर्फ भुऱ्या नागपुरे याने त्याचे वडील लीलाधर आमि भाऊ कुंदनच्या मदतीने शशीची हत्या केली होती. या घटनेपासून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. भुऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने नागरिक दुखावलेले होते. ते पहिल्या दिवसापासूनच आरोपीला पोलिसांचे संरक्षण असल्याचा आरोप करीत आहेत. शांतिनगर येथील नागरिकांना आरोपी पोलीस कोठडीत आहे तरीही त्याला घरून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच त्याच्याशी फार सक्तीनेही वागले जात नसल्याचे म्हणणे आहे. याची माहिती होताच शांतिनगर येथील नागरिक बुधवारी रात्री ठाण्यावर धडकले. त्यांनी ठाण्याला घेराव घालून ठाणेदार एम.डी. शेख यांना निवेदन सादर केले. नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस आरोपींशी फार नरमाईने वागत आहे. आरोपींना परिसरातील दबंग लोकांचे संरक्षण प्राप्त आहे.
शशीच्या हत्येनंतर शांतिनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. नागरिक प्रचंड संतापले आहेत. मंगळवारी निरीक्षक एम.डी. शेख यांची बदलीही करण्यात आली. यानंतरही नागरिकांमध्ये पोलिसांविरुद्ध असंतोष कायम आहे. शशी कुटुंबातील एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात वृद्ध आई, पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.