नागपुरात संतप्त पत्नीने दारुड्या नवऱ्याला विटांनी ठेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:40 AM2019-02-25T10:40:57+5:302019-02-25T10:43:05+5:30
रात्रीच्या अंधारात विटांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी पत्नीच पतीची मारेकरी निघाली. तिने आपल्या वडिलाच्या मदतीने दारूड्या पतीला विटांनी ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्रीच्या अंधारात विटांच्या ढिगाऱ्यावर पडल्याने डोक्याला जबर मार बसल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी पत्नीच पतीची मारेकरी निघाली. तिने आपल्या वडिलाच्या मदतीने दारूड्या पतीला विटांनी ठेचून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यामुळे यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पत्नी लक्ष्मीबाई इंदरलाल इनवाती (वय ३५) आणि तिचे वडील दशरथ बुढा मरस्कोल्हे (वय ६२) या दोघांना अटक केली.
शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. इंदरलाल इनवाती मुळचा सीतापार कुरई (जि. शिवनी मध्य प्रदेश) येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात तो नागपुरात आला होता. यशोधरानगरातील भिलगावच्या बुद्धनगरीत तो कुटुंबीयांसह राहायचा. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ते कामावरून घरी परत जात असताना रस्त्यावर पडलेल्या विटाच्या ढिगाऱ्यावर अडखळून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इंदरलालची पत्नी लक्ष्मीबाई इनवाती हिने पोलिसांना दिली होती. त्यावरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
दारूच्या नशेत अत्याचार करायचा
नवरा दारुडा होता. तो कामावरही जात नव्हता आणि पत्नीकडून पैसे हिसकावून दारूच्या नशेत मारहाण करून अत्याचार करायचा. शुक्रवारी रात्री असेच झाले. दारूच्या नशेत त्याने पत्नीला मारणे सुरू केले. त्यामुळे रागाच्या भरात लक्ष्मीबाई आणि तिचे वडील दशरथ मरस्कोल्हे यांनी त्याला विटांनी मारले. डोक्यावर विटांचे फटके बसल्याने तो जबर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मीबाई इनवाती आणि दशरथ मरस्कोल्हे या दोघांना इंदरलालच्या हत्येच्या आरोपात अटक केली.