Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 07:57 AM2024-06-14T07:57:37+5:302024-06-14T07:59:12+5:30

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत.

Nagpur: Apprentices were handling 500 kg explosives without security, 6 killed in blast | Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

- जितेंद्र ढवळे/ नरेश डोंगरे/ योगेश पांडे
नागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, सूत्रांनी स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या. सुमारे ५०० किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनेचे कारण अस्पष्ट
‘लोकमत’ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते. पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या. गुरुवारी नऊ कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके, वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता माेठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यासदेखील वेळ मिळाला नाही. 

रोषाचा भडका : या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला. 

एक मीटरमागे दोन मिलीग्रॅम बारूद
वात तयार करण्याची प्रक्रिया मशीनच्या माध्यमातून होत होती. त्याचे पॅकिंगचे काम कामगार करायचे. एक मीटर वातीमागे जवळपास दोन मिलीग्रॅम बारूद वापरण्यात येत होता. तेथे चारकोल, सल्फर, पोटॅशिअम होते. पॅकिंग झालेल्या वाती बॉक्समध्ये ठेवण्यात येत होत्या. एका अर्थाने त्या जिवंत वाती होत्या व घर्षणामुळे स्पार्क होऊन स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नेमके काय घडले?
२२ एकरांत पसरलेल्या कंपनीत बारूद व फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. 
मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासन थंड होते.
दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहोचले. तोपर्यंत चार ते पाचजणांचा मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळी धाव : पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

 

Web Title: Nagpur: Apprentices were handling 500 kg explosives without security, 6 killed in blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.