चित्तथरारक कवायतींनी नागपूरकर थक्क

By admin | Published: September 28, 2015 03:12 AM2015-09-28T03:12:31+5:302015-09-28T03:12:31+5:30

आकाशात एखादे हेलिकॉप्टर जरी जवळून जाताना दिसले तरी ते पाहण्यासाठी कुतुहल असते. पण, एकाचवेळी चार हेलिकॉप्टर एकमेकांना स्पर्शून जात असतील ....

Nagpur Athletic excited by the breathtaking drill | चित्तथरारक कवायतींनी नागपूरकर थक्क

चित्तथरारक कवायतींनी नागपूरकर थक्क

Next

वायुसेनेचा ‘एअर फेस्ट’ : आकाशगंगा,
गरुड आणि सारंगने जागविल्या देशभावना

नागपूर : आकाशात एखादे हेलिकॉप्टर जरी जवळून जाताना दिसले तरी ते पाहण्यासाठी कुतुहल असते. पण, एकाचवेळी चार हेलिकॉप्टर एकमेकांना स्पर्शून जात असतील आणि तेसुद्धा केवळ एक-दोनवेळा नव्हे तर अनेकदा. वायुसैनिक प्रत्यक्ष युद्धात रणभूमीवर जे शौर्य आणि धाडस दाखवितात ते प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि नागपूरकर थक्क झाले.
निमित्त होते भारतीय वायुसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘एअर शो’ चे. यावेळी कमांडो कारवाईदरम्यान हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साह्याने उतरणे, पॅराग्लायडिंग अशा एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधले.
रविवारची सकाळ ही नागपूरकरांसाठी विशेष होती. एकीकडे गणपती विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू होती तर दुसरीकडे भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापनदिनानिमित्त वायुसेनानगर येथील अनुरक्षण कमान मुख्यालय परिसरात आयोजित ‘एअर शो’ होता.
एअर शोदरम्यान आकाशगंगा, सारंग आणि गरुडने चांगलेच आकर्षित केले. या तीनही चमूच्या वायुसैनिकांनी सादर केलेल्या धाडशी करामतींनी नागपूरकरांमध्ये देशभावना निर्माण केली. अनुरक्षण कमान मुख्यालयाचे कमांडिंग इन-चीफ एअर मार्शल जगजित सिंह यांचे आगमन होताच दोन ‘एमआय-१७ व्ही-५’ हेलिकॉप्टरच्या ‘फ्लायपास्ट’ने त्यांचे स्वागत करीत या सोहळ्याची सुुरुवात झाली.
यावेळी आकाशात रंगबिरंगी फुगे सोडण्यात आले. नागपूरकरांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. ‘एमआय-१७ व्ही-५ हे अत्याधुनिक श्रेणीत मोडणारे हेलिकॉप्टर म्हणून गणले जाते. वायुसेनेतर्फे राबविण्यत येणाऱ्या विविध आॅपरेशनमध्ये याचा वापर केला जातो. (प्रतिनिधी)
अन् प्रत्यक्ष रणभूमीच साकारली
एअर मॉडेलिंग शो संपताच ‘स्काय डायव्हिंग’ करीत भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो एका लढाऊ हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साह्याने मोकळ्या मैदानात भराभर उतरले आणि लगेच आपापली पोझिशन घेऊन शत्रू सैनिकांना शोधून एकेक करून मारले. युद्धातील हा प्रसंग प्रत्यक्षपणे वायुसेनानगरात साकारण्यात आला, तेव्हा उपस्थित तरुणाईने टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करून त्यांच्याप्रति आदरभाव व्यक्त केला.
उत्कृष्ट प्रदर्शन
भारतीय वायुसेनाद्वारा तरुणांना आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘एअर शो’मध्ये आकाशगंगा आणि सारंग चमूचे प्रदर्शन हे सर्वांना आकर्षित करीत असते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आकाशगंगाच्या टीमने पॅराशूटच्या मदतीने आकाशात चित्तथरारक कवायती सादर केल्या. ‘सारंग’ टीमने केलेल्या चित्तथरारक कवायतींनी या शोला रंगत आणली. त्यांनी आकाशात एकापेक्षा एक चित्तथरारक कवायती सादर केल्या.

Web Title: Nagpur Athletic excited by the breathtaking drill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.