नागपुरात पावसामुळे वातावरणात गारवा : तापमान घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:10 AM2019-04-18T00:10:45+5:302019-04-18T00:11:50+5:30
पावसामुळे तापमान घटून वातावरणात गारवा पसरला आहे. असह्य उकाड्यातून सुटका झाल्याने शहरवासी सुखावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे तापमान घटून वातावरणात गारवा पसरला आहे. असह्य उकाड्यातून सुटका झाल्याने शहरवासी सुखावले आहेत.
गेल्या २४ तासात तापमान २.२ डिग्रीने कमी झाले. बुधवारी कमाल ३५.९ डिग्री तापमान नोंदले गेले. केवळ दुपारी ऊन व ढगांमुळे थोडा उकाडा जाणवला. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली. आर्द्रता ६६ टक्के होती. अफगाणिस्तान व पाकिस्तान सीमेवरील वेस्टर्न डिस्टर्बेंस आणि बंगालची खाडी व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे उत्तर-पश्चिम भारतात वेगवान वादळासह पाऊस पडत आहे. हवामान विभागानुसार, येत्या २४ तासापर्यंत आकाश ढगाळ राहील व हलका पाऊस पडत राहील. वेस्टर्न डिस्टर्बेंस व कमी दबावाचे क्षेत्र पूर्वेकडे वाटचाल करीत आहे. परिणामी, वातावरणातील आर्द्रता कमी होईल. त्यानंतर परत उष्णता वाढायला लागेल. एप्रिलच्या शेवटी व मेमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडला. अमरावतीत १०, बुलडाण्यात ५, यवतमाळमध्ये ३.४ तर, अकोल्यात २.४ मिमि पावसाची नोंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यस्तरापेक्षा खाली उतरले.
चार दिवसात ८.३ डिग्रीची घट
गेल्या चार दिवसात नागपुरातील तापमान वेगात खाली उतरले. १४ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४.२ डिग्री होते तर, १७ एप्रिल रोजी ३५.९ डिग्री कमाल तापमानाची नोंद झाली. चार दिवसांत कमाल तापमान ८.३ डिग्रीने खाली उतरले.
तारीख कमाल तापमान
१४ एप्रिल ४४.२
१५ एप्रिल ४२.०
१६ एप्रिल ३८.१
१७ एप्रिल ३५.९