नागपुरात वृद्ध पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:36 PM2019-03-30T12:36:00+5:302019-03-30T12:38:56+5:30
संशयाने पछाडलेल्या एका वृद्धाने आपल्या पत्नीचा हातोड्याने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशयाने पछाडलेल्या एका वृद्धाने आपल्या पत्नीचा हातोड्याने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. यात पुष्पा पुरुषोत्तम हिंगणेकर (वय ५५) नामक महिला गंभीर जखमी झाली. मनीषनगर जवळच्या कृषी नारा सोसायटीत गुरुवारी दुपारी १२. ३० वाजता ही थरारक घटना घडली.
पुरुषोत्तम नामदेव हिंगणेकर (वय ६५) असे आरोपीचे नाव आहे. तो कमालीचा संशयखोर आहे. पत्नी, मुलगा, सून असे भरलेले कुटंब असूनही संशयाने पछाडलेला हिंगणेकर नेहमीच कुटुंबातील मंडळीसोबत वाद घालत होता. पत्नी पुष्पा जेवणात विष कालवून आपल्याला मारेल, अशी भीती नेहमी त्याच्या मनात राहायची. त्यामुळे तो पत्नीसोबत जवळपास रोजच भांडण करीत होता. गुरुवारी दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास असेच झाले. पुष्पासोबत जेवणाच्या वेळी त्याने वाद घालून घरातील हतोडीने पुष्पाच्या डोक्यावर फटके हाणले आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. वरच्या माळ्यावर राहणारी सून प्रीती सोनल हिंगणेकर हिने हा प्रकार पाहिला. तिने आरडाओरड केली. शेजारी धावत येतील असा अंदाज आल्याने आरोपी पळून गेला.
प्रीतीचा आरडाओरडा ऐकून शेजारची मंडळी तिच्या घरी आली. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या पुष्पा यांना मेडिकलमध्ये दाखल केले. प्रीतीने दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यातील हवलदार सुरेश शेजव यांनी गुन्हा दाखल करून आरोपी पुरुषोत्तमला अटक केली.
मानसिक स्थिती बिघडल्याचा अंदाज
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पुरुषोत्तम सैन्यात होता. १९९० ला त्याने निवृत्ती घेतली. तेव्हापासूनच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. नेहमी तिला मारहाण करायचा. त्यामुळे त्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या आईसोबत घरातच वेगळे राहणे सुरू केले. मोठ्या मुलाचा विवाह झाल्याने तो वरच्या माळ्यावर राहतो. तर, पुष्पा आणि छोटा मुलगा खाली राहतात. आरोपी खालच्या माळ्यावर एका खोलीत वेगळा राहत होता. पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हापासून तो पोलिसांनाही विसंगत माहिती देत आहे. त्याची मानसिक स्थिती बिघडल्याचा अंदाज त्यावरून पोलिसांनी काढला आहे.