नागपुरात अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:41 AM2019-07-06T00:41:30+5:302019-07-06T00:42:34+5:30
भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्यालयाचे नुकसान केले. या बाबीचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीसमोर निषेध करून निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्यालयाचे नुकसान केले. या बाबीचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीसमोर निषेध करून निदर्शने करण्यात आली.
यावलकर यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना शिबिराच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. तसेच शासकीय कार्यालयातील तावदाने तोडून कार्यालयाचे नुकसान करण्यात आले. या घटनेचा विदर्भातील सर्व कामगार कार्यालयांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. काळ्या फिती लावून दिवसभर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले. प्रशासकीय इमारत २ मधील सर्व कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी कामबंद आंदोलन करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा नागपूरच्या वतीनेही सार्वजनिक बांधकाम विभागातील महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतणे, कामगार आयुक्त कार्यालयात रवींद्र यावलकर यांना मारहाण करण्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. जुने सचिवालय परिसर सिव्हिल लाईन्स येथे संघटनेच्या वतीने नारे-निदर्शने करून घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर कामगार कार्यालयात आयुक्तांना भेटून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, नागपूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, नारायण समर्थ, बुधाजी सुरकर, श्याम वांदिले, नाना कडबे, यशवंत कडू, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शेंडे, मंगला जाळेकर, केशव शास्त्री, स्नेहल खवले, मनीष किरपाल, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत, पद्मा सलामे, विनोद पारजवार, संजय तांदुळकर,वंदना परिहार, गौतम धोंगडी, धनंजय डबाळ, गजानन जाधव उपस्थित होते.