नागपुरात तरुणाला कारने चिरडण्याचा प्रयत्न,चाकूनेही हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:34 AM2019-10-30T00:34:21+5:302019-10-30T00:35:02+5:30
जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ११.३० वाजता ही थरारक घटना घडली.
अक्षय अशोक खोब्रागडे (वय २८) असे जखमीचे नाव असून, तो सध्या खासगी इस्पितळात दाखल आहे. तर, त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे शिवम जयस्वाल, नीरज भोयर आणि सोनू काळबांडे आहे.
खोब्रागडे नंदनवनमधील देशपांडे ले-आऊटमध्ये राहतात. त्याच भागात शिवम जयस्वाल राहतो. त्याच्यासोबत खोब्रागडेचा जुना वाद आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध यापूर्वी तक्रारीही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खोब्रागडे सोमवारी रात्री ११.३० वाजता पाळीव श्वान परिसरात फिरवीत असताना जयस्वालने वेगात कार चालवून त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत खोब्रागडेंनी बाजूला उडी मारल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोलवर धडकली. त्यानंतर आरोपी नीरज भोयर कारबाहेर आला आणि त्याने खोब्रागडेवर चाकूहल्ला चढवला. खोब्रागडेंनी घट्टपणे चाकू पकडून प्रतिकार केल्याने आरोपी सोनू काळबांडेने त्यांच्यावर मागून लाकडी दंड्याने वार करून त्यांना जबर जखमी केले. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. खोब्रागडेंनी नंदनवन पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पीएसआय बारड यांनी प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली शिवम जयस्वाल, नीरज भोयर आणि सोनू काळबांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.