ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:44 PM2024-09-13T12:44:47+5:302024-09-13T12:47:12+5:30

नागपूर ऑडी अपघातापूर्वी ज्या बारमध्ये संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गेले होते त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nagpur Audi case CCTV footage of Sanket Bawankule in bar missing | ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

Nagpur Audi Crash Case : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने पाच दिवसांपूर्वी मध्यरात्री नागपुरात वाहनांना धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या घटनेनंतर विरोधकांनी संकेत बानवकुळेवर गंभीर आरोप केले आहेत. घटनेच्या आधी संकेतनेही मद्यपान केले होते का असा सवालही विरोधकांनी केला. मात्र आता संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी नागपुरात ऑडी कारने अनेक वाहनांना धडक देण्यापूर्वी भेट दिलेल्या ला होरी बारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र गेलेल्या बारचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मध्यरात्री बारमधून बाहेर पडल्यानंतर संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कारने पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन लागलीच घरी सोडण्यात आलं. अपघातावेळी चालक अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार  तिघांनाही चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशीनंतर चालकाला अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला. अपघातानंतर संकेत याच्या गाडीची कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांनी सांगितले. कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि तिसरी व्यक्ती रोनित चित्तमवार मागच्या सीटवर बसले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली होती.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातापूर्वी संकेत आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलात जेवण आणि मद्यसेवन केले होते त्या बारचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी हा कॅमेरा ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. नागपुरातील धरमपेठमच्या उच्चभ्रूंच्या वस्तीत असलेल्या ‘ला होरी’ बारमध्ये संकेत व त्याचे मित्र अपघाताच्या आधी आले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर हॉटेलचा मॅनेजर सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करत होता. मात्र कारवाई करण्याचा इशारा देताच त्याने सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांकडे दिला. मात्र, कॅमेऱ्यात रविवार रात्रीपासूनचे फुटेज गायब करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले.

"ते ला होरी बारमध्ये होते तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. आम्ही बुधवारी त्यांचा डीव्हीआर जप्त केला आणि तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे,” असे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ला होरीचा मॅनेजरने मंगळवारी सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तपास पथकाला देण्यास नकार दिला होता. “कायदेशीर कारवाईची धमकी दिल्यानंतर बार मॅनेजरने माघार घेतली. मात्र, रविवारी रात्रीपासून कोणतेही फुटेज नसल्याचे आमच्या लक्षात आले. पुढील तपास सुरू आहे,” असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Nagpur Audi case CCTV footage of Sanket Bawankule in bar missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.