नागपुरात ऑटोचालकाने चाकूच्या धाकावर लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:59 PM2019-02-15T23:59:34+5:302019-02-16T00:00:42+5:30
पायी जात असलेल्या एका तरुणाला टेका नाका परिसरात सोडून देतो, अशी बतावणी करून गुंड ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार मिळताच पावपावली पोलिसांनी लुटारू ऑटोचालक शेख सुलतान शेख मोहम्मद (वय १९) आणि राहिल खान राशिद खान (वय २१) या दोघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पायी जात असलेल्या एका तरुणाला टेका नाका परिसरात सोडून देतो, अशी बतावणी करून गुंड ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार मिळताच पावपावली पोलिसांनी लुटारू ऑटोचालक शेख सुलतान शेख मोहम्मद (वय १९) आणि राहिल खान राशिद खान (वय २१) या दोघांना अटक केली.
गोंदिया जिल्ह्यातील कामठा (झिरीमिरी) येथील सुनील दादुराम फरकुंडे (वय २६) हा बुधवारी रात्री बुद्धनगरातील मोठ्या गुरुद्वारासमोरून जात होता. त्याच्या मागून एक ऑटो आला. कुठे जातो, असे विचारले असता सुनीलने त्याला टेका नाका म्हणताच सोडून देतो, असे म्हणत आरोपी सुलतान आणि राहिलने त्याला आपल्या ऑटोत बसविले. काही अंतरावर त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ७०० रुपये हिसकावून घेत त्याला धक्का मारून बाहेर काढले. त्यानंतर आरोपी पळून गेले. सुनीलने या प्रकरणाची तक्रार नोंदविताच पाचपावली पोलिसांनी धावपळ करून आरोपी सुलतान तसेच राहिलला शोधून काढले. त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेतील ४५० रुपये, चाकू तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला.
परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, पीएसआय टी. एम. ढाकुलकर, हवलदार राजू अवस्थी, नायक राज चौधरी, विनोद लांडे, विनोद बरडे, गजानन निशितकर, सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.