जगातील ‘टॉप’ दोन टक्क्यांमध्ये नागपूरकर संशोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 02:23 PM2020-11-05T14:23:27+5:302020-11-05T14:25:33+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे यांचा जगातील ‘टॉप’ दोन टक्के संशोधकांमध्ये समावेश झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसाधारण मोठी शहरे किंवा नामांकित संशोधन संस्थेमधील प्राध्यापक व संशोधकच जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करू शकतात असा समज आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे यांनी याला छेद दिला आहे. जगातील ‘टॉप’ दोन टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. अशी कामगिरी करणारे ते विद्यापीठातील पहिलेच प्रोफेसर आहेत.
अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ.जॉन लोन्नडीस, डॉ.केव्हीन बायक व डॉ.जेरोन बास यांनी जगभरातील संशोधकांच्या ‘स्कोपस डाटा बेस’ची माहिती एकत्रित केली. ‘स्कोपस’चे ‘सायटेशन’, ‘एच-इंडेक्स’ व प्रकाशित झालेल्या संशोधन पत्रिकांच्या आधारावर त्यांनी अभ्यास केला. यात डॉ. ढोबळे यांचे नाव ‘अप्लाईड फिजिक्स’या विषयात जगातील ‘टॉप’ दोन टक्के संशोधकांमध्ये समाविष्ट करण्यात आले. या विषयावर जगभरातील लाखो संशोधक संशोधन करत असतात हे विशेष.
डॉ.ढोबळे यांनी ‘एलईडी’, ‘रेडिएशन डॉमिसेट्री मटेरिअल’, ‘बायोसिंथेसिस’, ‘वॉटर प्युरिफिकेशन’, ‘नॅनो मटेरियल’ इत्यादी विषयांवर ८१७ हून अधिक संशोधन पत्रिका प्रकाशित केल्या आहेत.