नागपुरात तेजस्विनी महिला विशेष बसचा ९.६० कोटींचा निधी अखर्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 08:15 PM2018-02-13T20:15:48+5:302018-02-13T20:18:53+5:30
महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अखर्चित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अखर्चित आहे.
फेबु्रवारीचा दुसरा आठवडा संपायला आला तरी अद्याप तेजस्विनी बसच्या निविदा काढण्यात आलेल्या नाही. यामुळे अखर्चित निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाचा दर महिन्याचा तोटा आठ ते नऊ कोटी आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून उपलब्ध झालेला निधी खर्च होत नसल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत शहर बससेवा पर्यावरणपूरक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डिझेल बसेस कमी करण्याचा सल्ला दिला होता. याचा विचार करता शासनाकडून मिळालेल्या निधीतून तेजस्विनी बसेससाठी पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गडकरी यांच्या बैठकीनंतर काही दिवसातच परिवहन समितीच्या बैठकीत पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु २० दिवसानंतरही परिवहन विभागाने बस खरेदीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. निर्धारित कालावधीत निविदा न काढल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.
प्रस्तावाला समितीची मंजुरी
शहर बससेवा पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी परिवहन समितीचे प्रयत्न आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनी बससाठी मिळालेल्या निधीतून पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येतील. महिलांसाठी त्यात बदल केला जाईल. समितीने याबाबतच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली. परिवहन विभागाकडे फाईल पाठविण्यात आली आहे. परिवहन व्यवस्थापकासोबत चर्चा करून बसेस खरेदी करण्याचे निर्देश दिले जातील. या प्रकल्पाकडे गडकरी यांचेही लक्ष आहे.
बंटी कुकडे, परिवहन सभापती महापालिका