नागपुरात होणार आठ कोटींच्या न्युक्लिअर मेडिसीनची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:54 AM2019-02-19T10:54:20+5:302019-02-19T10:55:42+5:30
एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. या विभागामुळे कर्करोगाचा निदानासोबतच एन्डोक्रिनोलॉजी, थायराईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी व हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांसाठी हा विभाग वरदान ठरणार आहे. राज्यात शासकीय रुग्णालयामध्ये नागपूर मेडिकलमध्ये सुरू होणारा हा पहिला विभाग असणार आहे.
कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास त्यावरील उपचाराचा यशाचा दर वाढतो. शिवाय उपचाराचा खर्च कमी होतो. परंतु शासकीय रुग्णालयात येणाºया कर्करोगाच्या रुग्णांना याचे निदान करण्यासाठी खासगीचा रस्ता धरावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘न्युक्लिअर थेरपी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही उपचारपद्धती एक्स-रे व सीटीस्कॅन यांच्या निदान उपचारपद्धतीपेक्षा वेगळी आहे. यात ‘गॅमा कॅमेरा’च्या माध्यमातून कर्करोग आहे किंवा नाही, कर्करोग झाला असल्यास देत असलेल्या उपचाराला किती प्रतिसाद मिळतो आहे, नेमक्या किती पेशी बाधित आहेत, याचे सूक्ष्म निरीक्षण या ‘न्युक्लिअर मेडिसीन’मध्ये होते. एखाद्या अवयवाला बाधा झाली असेल त्याचा किती भाग निकामी झाला आहे किंवा चांगला आहे तसेच उपचारामुळे किती प्रमाणात सुधारणा होते आहे या सर्व बाबी या उपचारपद्धतीमधून सामोर येतात. असेच हृदयरोग, एन्डोक्रिनोलॉजी, थायरॉईड, मूत्रपिंड प्रत्यारोपण, न्युरोलॉजी संदर्भात आहे. या नव्या विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला जाणार आहे.
हृदयाच्या अचूक स्थितीचेही निदान
हृदयविकाराच्या धक्क्यानंतर हृदयाच्या स्नायूंची स्थिती कशी आहे, किती स्नायू मृत झाले आहेत याचा अचूक अंदाज ‘न्युक्लिअर मेडिसीन’मधून मिळतो. स्नायू मृत झाले असतील तर ‘स्टेंट’चा काही उपयोग होत नाही. अशा वेळेस उपचारांची पुढील दिशा ठरवता येते.
शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार
‘न्युक्लिअर मेडिसीन’ ही अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. या उपचारपद्धतीमुळे रुग्णांना फायदा तर होईलच, सोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीही उपलब्ध होणार आहे. विशेषत: भविष्यात सुरू होणाºया कॅन्सर इन्स्टिट्यूला हा विभाग पूरक ठरेल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल