नागपुरात चार तासांत रस्त्यांची झाली नदी; १४ जनावरे दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:03 AM2023-09-24T08:03:55+5:302023-09-24T08:04:17+5:30
अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नाग नदी, पिवळी नदीला पूर आला
योगेश पांडे/कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागपुरात हाहाकार उडाला. अवघ्या ४ तासांत कोसळलेल्या १०९ मि. मी. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. घरात पुराचे पाणी शिरल्याने महेशनगरातील मीराबाई पिल्ले (७०) व तेलंगखेडी, सुरेंद्रगड येथील संध्या ढोरे (८०) यांचा मृत्यू झाला. हजारी पहाड येथे नाल्याच्या पुराचे पाणी गोठ्यात शिरल्याने १४ जनावरे दगावली. पावसाने उडालेल्या हाहाकाराचे एरवी राजधानी मुंबईमध्ये दिसणारे चित्र शनिवारी उपराजधानीमध्ये दिसले.
अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नाग नदी, पिवळी नदीला पूर आला. पुराचे पाणी वस्त्यांमध्येही शिरल्याने नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता नागपुरात मुसळधार पाऊस सुरू झाला. सतत तीन तास झालेल्या विजांच्या तांडवामुळे सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरस्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेतला. नुकसानाचे तातडीने सर्वेक्षण करून बाधितांना मदतीचे आदेश दिले.
४०० लोकांना काढले पुरातून बाहेर
अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन पाणी नाग नदीत शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये चार फुटांवर पाणी गेल्याने नागरिकांना बोटीने बाहेर काढले. बचाव पथकांनी ४०० हून जास्त लोकांना पुरातून बाहेर काढले.
कार तरंगल्या
मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पार्क केलेल्या कार पाण्यावर तरंगल्या. ‘आपली बस’ची सेवा ठप्प पडली. रेल्वे स्थानकातही पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले.
शाळांना सुट्टी परीक्षा रद्द
पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेसुद्धा शनिवारी होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परीक्षा रद्द केल्या.
राज्यभरात बरसला
गोंदिया : पुजारीटोला व कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले.
भंडारा : वैनगंगा नदीची जलपातळी धोक्याखाली, गोसे खुर्द धरणाचे
३३ दरवाजे उघडले.
अकोला : प्रकल्पांत ७८.५९ टक्के जलसाठा, काटेपूर्णा ७४ टक्के
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी मुसळधार बरसला.
नाशिक : पावसामुळे गोदावरी नदीला पूर.
जळगाव : पारोळा येथे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा १४ तासांनी सापडला मृतदेह.