जीपीएस घड्याळीने नागपूर ठरले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:07 AM2018-05-17T00:07:55+5:302018-05-17T00:08:15+5:30
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे यंदा देशभरातील ४३०२ शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्यावर्षी मात्र केवळ ४३४ शहरांमध्येच हे सर्वेक्षण झाले होते. यावर्षी शहरांची यादी क्रमानुसार जाहीर न करता कॅटेगरी व झोनच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्कालीन मनपा आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान अतिशय परिश्रम घेतले होते. ५० हजाराच्या जवळपास लोकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले होते. डोअर टू डोअर कचरा कलेक्शनपासून तर रेल्वे, बस स्टॅँडपर्यंतची स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली होती.
एकूण शहरांच्या यादीमध्ये यंदा टॉप थ्री शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. इंदूरला सलग दुसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. भोपाळ दुसऱ्या आणि चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीत ५२ अवॉर्ड देण्यात आले. यात नागपूरला इनोव्हेशन कॅटेगरीत हा पुरस्कार मिळाला. तीन ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये इनोव्हेशन अवॉर्ड उत्तर प्रदेशातील अलीगड आणि एक ते तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात झारखंडमधील अंबिकापूर शहराला इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला.
मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले की, जीपीएस घड्याळासाठी नागपूरला इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला आहे. इतर बाबतीतही शहराचे प्रदर्शन चांगले राहिले. यंदा स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली नाही. वेगवेगळ्या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. नागपूरचे प्रदर्शन समाधानकारक राहिले. कारण तब्बल ४२०३ शहरांमध्ये स्पर्धा होती.
गेल्या वर्षी मिळाले होते ५७.९५ गुण
यंदा नागपूर शहराला किती गुण मिळाले, ते जाहीर करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी नागपूर मनपाला २ हजार गुणांपेकी ११५९ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ५७.९५ टक्के इतकी होती. कचऱ्याचे कलेक्शन आणि वाहतुकीत नागपूरला ३६० पैकी २९३ गुण मिळाले होते. त्याची एकूण टक्केवारी ही ८१.३९ इतकी होती. गेल्या वर्षी स्वच्छता अॅप डाऊनलोडच्या बाबतीत नागपूरचे प्रदर्शन अतिशय वाईट होते. १५० पैकी केवळ २० गुण मिळाले होते. त्यामुळेच यंदा स्वच्छता अॅपकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. ५० हजाराच्या जवळपास लोकांनी हा अॅप डाऊनलोड केला होता.
नागरिकांचे अभिनंदन
स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरला यश आल्याने अतिशय आनंदी आहे. यासाठी सर्वांनीच अतिशय परिश्रम घेतले. मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच नागरिक आणि मीडियाचीही महत्त्वाची भूमिका राहिली. मनपाने चांगले काम केले. त्यामुळेच आजचे यश मिळाले. त्यामुळे सर्वांचेच विशेषत: नागपूरकर नागरिकांचे विशेष अभिनंदन.
अश्विन मुदगल
जिल्हाधिकारी