नागपुरात भिकाऱ्यांनी घेतला भिकाऱ्याचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:59 PM2020-07-31T21:59:19+5:302020-07-31T22:00:33+5:30
दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसभर इकडे तिकडे भटकून, मिळेल ते खाऊन रात्रीच्या वेळी फूटपाथवर झोपणाऱ्या दोन भिकाऱ्यांनी तिसऱ्या एका भिकाऱ्याची दगडांनी ठेचून हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे पाहून हत्या करणारे दोन्ही आरोपी पोलीस ठाण्यात पोहोचले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनी मंदिर मार्गावरच्या फूटपाथवर शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
नंदकिशोर जीवन नंदनवार (रा. रायपूर, हिंगणा) आणि सोनू ऊर्फ सोहेल खान बाबू खान अशी आरोपींची नावे आहेत. मृताचे नाव सोनू असल्याचे पोलीस सांगतात. त्याचे पूर्ण नाव आणि सविस्तर माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही. आरोपी नंदकिशोर नंदनवार सोहेल खान आणि मृत सोनू हे कॉटन मार्केट चौक परिसरात दिवसभर इकडे-तिकडे फिरायचे. मिळेल ते खायचे आणि फूटपाथवर झोपायचे. इकडे-तिकडे भटकताना कोणती काही चिजवस्तू आढळल्यास ते विकून त्यातून आलेल्या पैशातून ते दारू पीत होते. आजूबाजूला राहत असल्यामुळे त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी व्हायची.
काही दिवसांपासून सोनूसोबत एका महिलेची ओळख झाली. ती नेहमी त्याच्याकडे यायची. त्यामुळे आरोपी नंदनवार आणि खान हे दोघे त्याला टोचून बोलत होते. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला सुरुवात झाली. पाहता पाहता ते एकमेकांना मारहाण करू लागले. एवढ्यात आरोपी नंदनवार आणि खान यांनी फूटपाथवर पडलेले सिमेंटचे गट्टू उचलून सोनूच्या डोक्यावर मारले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे आरोपी घाबरले. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी तेथून पळाले आणि सरळ धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना झालेली घटना सांगितली. एएसआय शेखर सरोदे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी सोनुला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी नंदनवार आणि खान या दोघांना हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. मृत सोनूबाबत रात्रीपर्यंत सविस्तर माहिती मिळाली नसल्याचे पोलीस सांगत होते.
यापूर्वीही घडली होती घटना
काही दिवसांपूर्वी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील चौकातील उड्डाण पुलाखाली एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्या वर अशाच प्रकारे सिमेंटच्या गट्टूने हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.