नागपुरात ग्रामायणच्या दुसऱ्या सेवा प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:37 AM2018-11-18T01:37:03+5:302018-11-18T01:40:24+5:30

अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाºया संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकºयांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची रेलचेल असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.

In Nagpur the beginning of the second service exhibition of Gramayan | नागपुरात ग्रामायणच्या दुसऱ्या सेवा प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

नागपुरात ग्रामायणच्या दुसऱ्या सेवा प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्यांग संस्था, गोवस्तू, सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादकांच्या वस्तूंची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंध, मतिमंद व दिव्यांगांसाठी सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे तयार झालेल्या वस्तू, सेवाभावी संस्था व व्यावसायिकांसह गोशाळांमधील गोवस्तूंची उत्पादने, सेंद्रिय शेतकऱ्यांनी आणलेले सेंद्रिय धान्य, ग्रामीण उत्पादक व ग्रामीण तसेच शहरी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची रेलचेल असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व वस्तू खरेदी करून या सेवा संस्थांना मजबूत करण्याची संधी शहरवासीयांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन, राजेंद्रसिंह दिव्यांग कौशल्य विकास केंद्र, भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषद, अभाविप आणि ग्रामायण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी मार्ग, दीक्षाभूमी चौकातील मुंडले इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात या ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महापौर नंदा जिचकार, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पांड्या, व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, उद्योजक सुरेंद्र लोढा, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, ब्लार्इंड रिलिफचे अध्यक्ष निखिल मुंडले, नागेश कानगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रत्येक दिवशी एक थीम ठेवण्यात आली असून, पहिल्या दिवशीची ‘दिव्यांग संमेलन’ ही संकल्पना होती. यानिमित्त अपघातात एक पाय गमावल्यानंतरही जिद्दीने एव्हरेस्ट सर करणारा अपंग गिर्यारोहक अशोक मुन्ने यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगतातून आपला प्रवास उलगडला. यावेळी नंदा जिचकार यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिद्द आणि संघर्षाची अभिव्यक्ती म्हणजे ग्रामायण होय, असे मनोगत व्यक्त केले. जुन्या काळात ग्रामीण क्षेत्र श्रीमंत होते, कारण त्यांच्याकडे संभाव्य गोष्टी होत्या. ही समृद्धी पुन्हा जागे करण्याची गरज आहे, असे मत बी.सी. भरतीया यांनी व्यक्त केले. कृषिमालावर प्रक्रिया करून उद्योजक १०० पट नफा कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिमालाच्या मोलाची जाणीव करून देणे गरजेचे असल्याची भावना सोहम पांड्या यांनी व्यक्त केली. संचालन संजय सराफ यांनी केले. 



देवलापारच्या गो-शाळेची प्रतिकृती व ग्रामविज्ञान
देवलापार येथील गो-शाळा व गो-विज्ञान संशोधन केंद्राचे महत्त्व सर्वत्र पसरले आहे. गोपालन आणि गोधन कृषीचे महत्त्व दर्शविणारी प्रतिकृती ग्रामायण सेवा प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे. या गो-शाळेत गोधनाद्वारे मिळणाऱ्या वस्तूंवर संशोधन करून जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते. पंचगव्य, कामधेनू कीटकनाशक, गोमयादी लेप साबण, दंतमंजन, तेल, धूप अशा सर्व वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. दुसरीकडे वर्धा येथील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात निर्माण होणाऱ्या वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. गावाच्या विकासासाठी तंत्रज्ञान व संशोधन गावापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान पोहचविणाऱ्या या केंद्राद्वारे निर्माण केलेल्या वस्तू वनौषधी, फूड प्रोसेसिंग, मधमाशी पालन, आरोग्यम् वॉटर फिल्टर, अ‍ॅग्रोवेस्ट शेगडी आदी प्रदर्शनात आहेत. याशिवाय सेंद्रिय शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले आॅर्गनिक धान्य, ताज्या भाज्या, महिला बचत गटांद्वारे तयार केलेले खाद्यपदार्थ, शुद्ध तेल, गाईचे तूप, हस्तनिर्मित बॅग, कपडे, पादत्राणे अशा जीवनावश्यक वस्तूंसह विदर्भातील ग्रामीण भागात अभावग्रस्तांसाठी सेवा देणाऱ्या
संस्थांची माहिती या प्रदर्शनात बघावयास मिळत आहे.

 

Web Title: In Nagpur the beginning of the second service exhibition of Gramayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.