स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:33 AM2019-09-13T10:33:13+5:302019-09-13T11:07:43+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यातून आतापर्र्यंत फक्त २७०७ ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणात आपली मते नोंदविली आहेत. जिल्ह्यात १५ आॅगस्टपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोबाईल अॅपवर नोंदणी करायची आहे.
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ या देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता निरीक्षण, ग्रामस्थांचे स्वच्छतेविषयक आॅनलाईन अभिप्राय आणि स्वच्छताविषयक सद्यस्थिती या तीन मानकांच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा प्रमुख भाग म्हणजे यातून निघणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांचे आणि राज्यांचे स्वच्छतेतील स्थान आणि क्रमवारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे जिल्हे आणि राज्य यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्यासाठी स्मार्ट फोनधारक ग्रामस्थांनी प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणअंतर्गत ‘एसएसजी २०१९’ हे मोबाईल अॅप डाऊनलोड करून, त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ तसेच तालुका व जिल्हा परिषदेच्या सर्व आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक स्तरावरील युवक मंडळ, बचत गट यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. पण स्वच्छ सर्वेक्षणाचा ११ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या आढाव्यात राज्यात नागपूर जिल्हा २५ व्या स्थानी आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी आतापर्यंत नोंदविलेली मते लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय अत्यल्प आहेत. याचाच अर्थ सीईओंनी आवाहन केलेल्या यंत्रणांनी या अभियानाकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात ९७,००५, पुण्यात ५८,८२४ मते नोंदविण्यात आली आहेत. आतापर्यंत संपूर्ण राज्यात ३,५३,९५१ इतकी मते नोंदविण्यात आली आहेत. सर्वात कमी मते नंदूरबार जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहेत.