नागपुरात वीज बिलाविरुद्ध वाजले नगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:19 PM2020-07-11T20:19:05+5:302020-07-11T20:22:21+5:30
लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीजबिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला.
पक्षाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दडके यांच्या पुढाकाराने आयोजित आंदोलनात महापौर संदीप जोशी, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे व आ. मोहन मते, मंडळ अध्यक्ष किशोल पलांदूरकर, विनोद कन्हेरे, संजय अवचट, देवेन दस्तुरे, संजय चौधरी, भोजराज डुंबे, संजय ठाकरे, संजय बंगाले, राम आंबुलकर, सुनील मित्रा सहभागी झाले होते. दटके यांनी गोळीबार चौकात नगारा वाजवून राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, काहीही तारतम्य न ठेवता भरमसाट वीज बिल पाठवणे हे एक षड्यंत्र आहे. दुकाने बंद होती, कोविड संक्रमणामुळे कुलर बंद होते. गरिबांच्या घरात धान्यसुद्धा नव्हते. तरीही १० ते २० हजार रुपयाचे बिल पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे ऊर्जामंत्री नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. यावेळी वीज अधिभार आणि व्याज रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.
व्हेरायटी चौकात युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी, गोळीबार चौकात विणकर आघाडीचे प्रदेश संयोजक श्याम चांदेकर, लॉ कॉलेज चौकात शिक्षक सेलच्या कल्पना पांडे, प्रदीप बिबटे, कमाल चौकात प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम, अवस्थी चौकात उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, गिट्टीखदान चौकात प्रदेश कार्यकारिणी सदस्य माया इवनाते, शेखर येटी, नंदनवन चौकात झोपडपट्टी मोर्चाचे रमेश वानखेडे, दोसर भवन चौकात अल्पसंख्याक मोर्चाचे लाल कुरैशी, शहीद चौकात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, बैद्यनाथ चौकात कामगार आघाडीचे जयसिंह कछवाह, प्रतापनगर चौकात स्वच्छता अभियानचे भोलानाथ सहारे, कॉटन मार्केट चौकात माजी सैनिक आघाडीचे राम कोरपे, पुंडलिक सावंत, सक्करदरा चौकात क्रीडा आघाडीचे डॉ. संभाजी भोसले, पीयूष अंबुलकर, गड्डीगोदाम चौकात क्रिश्चियन आघाडीचे विकास फ्रान्सिस, रामनगर चौकात दक्षिण भारतीय आघाडीचे पी.एस.एन. मूर्ती, संदीप पिल्ले, संविधान चौकात लीगल सेलचे अॅड. नचिकेत व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.