Nagpur: रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड
By नरेश डोंगरे | Published: July 27, 2024 09:11 PM2024-07-27T21:11:03+5:302024-07-27T21:11:18+5:30
Nagpur Crime News: रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले.
- नरेश डोंगरे
नागपूर - रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले. मनोज कुमार ग्यानदिन (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो ठिकठिकाणच्या रेल्वे पोलिसांना वॉन्टेड असल्याचीही माहिती आहे.
उत्तर पश्चिमी दिल्लीतील अशोक विहारात राहणारा हा भामटा गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत 'जहरखुराणी'च्या गुन्हेगारीत सक्रिय आहे. विविध मार्गावरील रेल्वे गाडीत बसून तो बाजुच्या प्रवाशांसोबत सलगी साधतो. त्यांच्याशी लाडीगोडीने वागून सहप्रवाशाचा विश्वास संपादन केल्यानंतर हा भामटा त्या प्रवाशाला खाण्याच्या किंवा पिण्याच्या पदार्थात विशाक्त पदार्थ देतो (याला जहरखुराणी म्हणतात). त्यामुळे सहप्रवासी बेशुद्ध होतो आणि नंतर हा भामटा त्यांचे दागिने, माैल्यवान चिजवस्तू आणि सामान घेऊन पळून जातो. अहमदाबाद -हावडा एक्सप्रेसच्या कोच नंबर एस-४ मध्ये ६ जुलैला दिव्येश अटलबिहारी सक्सेना (रा. सॉल्ट लेक, कोलकाता) हे प्रवास करीत होते. आरोपी मनोजने त्यांच्याशी आधी लाडीगोडीने वागून नंतर त्यांना विषाक्त पदार्थ खायला दिला. ते बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने त्यांची बॅग चोरून पळ काढला. सक्सेना शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हावडा रेल्वे स्थानकावर त्याची तक्रार नोंदवली. ही घटना डोंगरगड जवळ घडली होती. त्यामुळे डोंगरगड रेल्वे पोलिसांनी नागपूर विभागातील सर्व पोलीस ठाणे आणि आरपीएफला कागदोपत्री पाठवून आरोपीला शोधण्यासाठी त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाठविले.
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातील वरिष्ठांनी या आरोपीला पकडण्यासाठी सलग दोन आठवडे प्रयत्न केले. सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तांत्रिक विश्लेषणातून या भामट्याचा छडा लागला. त्यावरून त्याला २५ जुलैला भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ३०५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तो ठिकठिकाणच्या रेल्वे पोलिसांना वॉन्टेड होता.
दुसऱ्या सावजाच्या होता शोधात
आरोपी मनोज हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला आरपीएफने प्रवासाच्या तयारीत असताना दिल्लीत ताब्यात घेतले. त्याच्याजवळच्या बॅगची तपासणी केली असता त्यात खाण्यापिण्याच्या चिजवस्तूंसह विषाक्त औषध (जहरखुरानी) आढळले. तो नेहमीप्रमाणे दुसरे सावज शोधण्यासाठी निघाला होता, हेसुद्धा त्यातून उघड झाले.
विविध प्रांतात १८ गुन्हे दाखल
आरोपी मनोजची चाैकशी केली असता त्याच्याविरुद्ध रेल्वे पोलीस अलिगढ, बरेली, मुरादाबाद सह विविध प्रांतातील रेल्वे पोलीस ठाण्यात विषाक्त पदार्थ देऊन लुटण्याचे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राथमिक चाैकशीतून पुढे आली.