नागपूर-भंडारा चारपदरी महामार्ग ६ वर्षानंतरही अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:20 PM2018-08-27T12:20:14+5:302018-08-27T12:20:37+5:30
सहा वर्षे उलटूनही नागपूर-भंडारा या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग-६ चे काही काम अजूनही अपूर्ण आहे. आता हा रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे.
वसीम कुरैशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा वर्षे उलटूनही नागपूर-भंडारा या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग-६ चे काही काम अजूनही अपूर्ण आहे. आता हा रस्ता सहापदरी करण्याचा प्रस्ताव आहे. महामार्गाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनी काहीही स्पष्ट करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येते. दरम्यान रस्त्यांवर खड्डेही पडू लागले आहे.
एनएच-६ नागपूर ते भंडारापर्यंत ४६ किमीच्या चार पदरी रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट वैनगंगा एक्स्प्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले होते. २०१२ मध्ये ४८४.१९ कोटी रुपयाचे हे काम सुरू झाले. जेएमसी प्रोजेक्ट इंडिया लि. ने हे काम केले. हीच कंपनी माथनी टोल नाक्यावर वसुलीही करते. या रस्त्याला आता दुरुस्तीची गरज आहे. नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) सुद्धा या महमार्गावरील त्रुटींबाबत गंभीर दिसून येत नाही. एलएचएआयतील संंबधित प्रकल्प व्यवस्थापक याबाबत बोलण्यास तयार नाहीत. सूत्रांनुसार भंडाराजवळ काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
विशेष म्हणजे हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता.
अनेक त्रुटी असूनही अथॉरिटी कंपनीवर इतकी मेहेरबान का? या रस्त्यावर ते लक्ष का ठेवू शकत नाही, त्रुटी असूनही कंत्राटदाराला कुठलेही पत्र का देण्यात आलेले नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहे.