नागपूर भूषण... भाई बर्धन
By Admin | Published: January 3, 2016 03:19 AM2016-01-03T03:19:23+5:302016-01-03T03:19:23+5:30
ए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते.
मजुरांचा ‘मसिहा’ : कामगारांचा हुंकार
उमेश चौबे
ए. बी. बर्धन यांच्या निधनाची बातमी कळल्यावर नि:शब्दच झालो. गरीब, शोषित, वंचितांच्या हक्कासाठी लढणारे हे लढवय्ये नेतृत्व होते. बर्धन म्हणजे मजुरांचे ‘मसिहा’ होते. याचा अनुभव मी अनेकदा घेतला. सध्या नेतृत्वावर विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती असताना बर्धन यांचे नेतृत्व गरीब, मजुरांसाठी अत्यंत आश्वासक होते. त्यांच्या निधनाने जाती, धर्म, पक्ष हे सारेच भेद विसरून काम करणारा मार्गदर्शक आणि आभाळभर उंचीचा नेता हरपल्याची भावना माझे मन विषण्ण करणारी आहे. आता खूप एकाकी वाटते आहे.
खऱ्या अर्थाने नागपूर आणि देशात गरीब, मजुरांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व बर्धन यांचे होते. त्याकाळात आम्ही काँग्रेस पक्षातर्फे मजुरांचे आंदोलन करीत होतो. आमच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम पक्षभेद विसरून बर्धन यांनी केले. शोषणमुक्तीसाठी आयुष्यभर कार्य करणारे बर्धन आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ होते. गेली ६० वर्षे त्यांच्या सहवासात मला राहता आले आणि त्यांना जवळून अनुभवता आले. नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मी उभा होतो. त्यावेळी बर्धन यांनी मला मदत केली त्यामुळेच मी निवडून येऊ शकलो. माझी विचारधारा वेगळी असताना बर्धन मला मदत करीत होते, त्यामुळेच त्यांच्याविषयीचे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. ते समतावादी विचारांचे होते पण सामाजिक समरसता सांभाळणारे होते. समाजात कुठलाही विखार निर्माण होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष होता. गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य करीत राहणे, हेच त्यांचे जीवनमूल्य होते.
नागपुरात मजुरांची चळवळ उभी करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनीच येथे एक वातावरण निर्मिती साधली होती. विद्यापीठात नंबुद्रीपाद यांना बोलावण्याची विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती पूर्णही केली होती.