नागपुरातील भाजपचे नगरसेवक धडकले आयुक्त मुंढे यांच्या घरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:00 AM2020-08-03T07:00:00+5:302020-08-03T07:00:07+5:30
नगरसेवक व स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अमय गोटेकर , नगरसेविका रूपाली ठाकूर, परशू ठाकूर याच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांनी नागपुरातील रविवारी सिव्हिल लाईन येथील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी रविवारी धडक देऊन धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिकेच्या प्रभाग ३२ मधील ईडब्ल्यूएस कॉलनीमध्ये गेल्या तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने प्रभागाचे नगरसेवक व स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अमय गोटेकर , नगरसेविका रूपाली ठाकूर, परशू ठाकूर याच्या नेतृत्वात त्रस्त नागरिकांनी रविवारी सिव्हिल लाईन येथील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी रविवारी धडक देऊन धरणे आंदोलन केले. म्हाडाने उभारलेल्या ईडब्ल्यूएस कॉलनी येथे महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. परंतु म्हाडाकडे पाणीपुरवठ्याचे बिल थकीत आहे.
यासंदर्भात येथील नागरिकांना कुठल्याही स्वरुपाची पूर्वसूचना न देता मनपाच्या जलप्रदाय विभागाने येथील पाणीपुरवठा बंद केला. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने त्रस्त नागरिकांनी अभय गोटेकर यांच्याकडे धाव घेतली. गोटेकर यांनी जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून नागरिकांचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा,थकित बिलासंदर्भात सोमवारी निर्णय घेतला जाईल. येथील नागरिकांची बिल भरण्याची तयारी असल्याची माहिती दिली. तसेच ओसीडब्ल्यू अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानंतरही रविवारी पाणीपुरवठा सुरू झाला नाही.
तीन दिवसापासून पाणी न मिळाल्याने गोटेकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन केले. तुकडोजी पुतळा चौकात नारेबाजी केली. त्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानी धडक दिली. आयुक्तांनी आंदोलकांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सीताबर्डी पोलिसांनी गोटेकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. आंदोलनात विनोद जंगले, सोहनलाल जैन, नितीन हजारे, अजय सिंग ठाकूर रोशन बघेल, भीमराव मेश्राम प्रफुल खेडकर, मनोज सुर्वे, रंजना व्यास, मरिया बोरकर, पुष्पा बसेन, माधुरी बघेल, भाग्यश्री सोमकुवर यांच्यासह वस्तीतील नागरिक सहभागी झाले होते.