अटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:10 PM2018-09-18T12:10:43+5:302018-09-18T12:14:05+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त देशभरात त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. देशातील विविध ठिकाणी यासंदर्भात आयोजनदेखील झाले. मात्र अटलजींचा ऋणानुबंध असलेल्या नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. वाजपेयींच्या अस्थींच्या कलशयात्रेत समोर असलेल्या नेत्यांनीदेखील यासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोक पाळण्यात आला. शिवाय त्यांच्या अस्थींच्या कलशाची देशभरात ठिकठिकाणी यात्रादेखील काढण्यात आली. अटलजींच्या प्रथम मासिक पुण्यतिथीनिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ अर्पण करून त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यात यावा. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात याचे आयोजन होईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. यात अटलजींच्या कवितांचे वाचन, कविसंमेलन यांचे आयोजन यांचादेखील समावेश असेल, असे शाह यांनी स्पष्ट केले होते.
त्याअनुसार १६ व १७ सप्टेंबर रोजी देशाच्या राजधानीसह विविध ठिकाणी ‘काव्यांजली’चे आयोजन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील मोठे नेते, कवी उपस्थित होते. मात्र नागपूर भाजपाला मात्र बहुधा राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेचाच विसर पडला. त्यामुळेच की काय शहरात एकाही विधानसभा क्षेत्रात कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अटलजींच्या अस्थींच्या कलश यात्रेत शहरातील अनेक नेते उपस्थित होते. त्यांनीदेखील या आयोजनासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहराध्यक्ष म्हणतात, एकत्रित आयोजन करणार
यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी १६ व १७ सप्टेंबर रोजी आयोजन झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे आयोजन करण्याऐवजी एकत्रित आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. याबाबत आमची प्राथमिक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आयोजन नेमके कधी होणार व त्याचे स्वरुप कसे होणार याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ‘काव्यांजली’चे आयोजन करण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले होते.
‘कार्यांजली’ चौकटीत बांधली गेली
‘काव्यांजली’ झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या आठवडा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होणारा सेवा सप्ताह पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपर्यंत चालेल व ही अटलजींना ‘कार्यांजली’ असेल, असे निर्देशदेखील अमित शाह यांनी दिले होते. नागपुरात सोमवारपासून काही प्रभागांमध्ये सोमवारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीदेखील यात सहभाग घेतला. मात्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगळे स्वच्छता अभियान व आरोग्य शिबीरांचे आयोजन झाले नसल्याची माहिती भाजपच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘सोशल मीडिया’वर शांती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ‘पोस्ट’ टाकण्यात भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र अटल ‘काव्यांजली’ व ‘कार्यांजली’चा उल्लेखदेखील दिसून आला नाही. अटलजींच्या नावाने ‘काव्यांजली’चा उपक्रम होणार की नाही, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.