कामगार रोज स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर, सुरक्षा वाऱ्यावर! कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेले जीव, कुटुंबीयांचा आरोप
By योगेश पांडे | Published: June 15, 2024 10:50 AM2024-06-15T10:50:05+5:302024-06-15T10:50:46+5:30
Nagpur Blast News: धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो स्फोटके व वातींमध्ये कामगार काम करत असतानाही सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट व परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली नव्हतीच, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही नसल्याचे समोर आले.
- योगेश पांडे
नागपूर - धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो स्फोटके व वातींमध्ये कामगार काम करत असतानाही सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट व परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली नव्हतीच, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही नसल्याचे समोर आले. मृतांच्या कुटुंबियांकडूनदेखील हा आरोप करण्यात आला आहे.
'लोकमत'ने यासंदर्भात कंपनीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्यूजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येत असल्याने येथे ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. मशीनने सेफ्टी फ्यूजेस व मायक्रोकॉर्ड तयार झाल्यावर महिलांकडून पॅकेजिंग करण्यात यायचे. मात्र कंपनीकडून कामगारांना आवश्यक सुरक्षा प्रणाली पुरविण्यात आली नव्हती. तसेच अग्निशमन यंत्रणादेखील हवी तशी नव्हती. त्यामुळेच स्पार्किंग झाल्यावर लगेच तेथे मोठा स्फोट झाला.
परिसरात एकहीरुग्णवाहिका नव्हती
मृत मशीन ऑपरेटर पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुरागनेही कंपनीकडून दुर्लक्ष झाल्याचा दावा केला. स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर सर्व लोक काम करत असताना परिसरात साधी रुग्णवाहिकाही तैनात नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे.
कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर तणाव : मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाईच्या मागणीवरून दिवसभर कंपनीसमोर तणावाचे वातावरण होते. प्रवेशद्वारासमोरच मृतदेह आणून तेथे आंदोलन करण्यात आले.
आणखी एक मृत्यू, ३५ लाखाच्या मदतीची ग्वाही
जखमींपैकी शुक्रवारी दानसा मरसकोल्हे (२६, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या सात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करुन नातेवाइकांना कंपनीकडून प्रत्येकी २५ लाख, राज्य सरकारकडून १० लाख, असे ३५ लाखाची मदत देण्याची ग्वाही दिली. आरोपींना अटक अन् जामीन पोलिसांनी कंपनीचा संचालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.