क्रिकेटच्या ट्रॉफीने दूर केली अंधत्वाची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:36 AM2018-02-22T11:36:52+5:302018-02-22T11:43:00+5:30
अंधत्व असलेल्या व्यक्तीला समाजच काय तर वेळप्रसंगी कुटुंबाकडूनही हेळसांड सहन करावी लागते. मात्र नागपूरच्या आत्मदीपम संस्थेने अंधत्वामुळे जगणे हरविलेल्या मुलींना प्रेम आणि काहीही शक्य करण्याचा आत्मविश्वासही दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधत्व असलेल्या व्यक्तीला समाजच काय तर वेळप्रसंगी कुटुंबाकडूनही हेळसांड सहन करावी लागते. मात्र नागपूरच्या आत्मदीपम संस्थेने अंधत्वामुळे जगणे हरविलेल्या मुलींना प्रेम आणि काहीही शक्य करण्याचा आत्मविश्वासही दिला. या आत्मविश्वासाच्या बळावर या मुलींनी थेट क्रि केटच्या मैदानापर्यंत धडक देत मैदान मारले व उपविजेताची ट्रॉफीही पदरात पाडली. ही ट्रॉफी हातात घेतलेल्या या मुलींच्या चेहऱ्यावर विश्वासाचे तेज दिसून येत होते.
क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लार्इंड महाराष्ट्र या संस्थेच्यावतीने १७ व १८ फेब्रुवारी यादरम्यान अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये आत्मदीपम संस्थेच्या पुढाकाराने पहिल्यांदाच विदर्भाची टीम सहभागी झाली होती. विदर्भात अंध पुरुषांची क्रिकेट टीम आहे. परंतु अंधाच्या क्रि केट संघटनेने महिलांसाठी पुढाकार घेतल्याने एक दिशा मिळाली. आत्मदीपम संस्थेने विदर्भातील पहिली महिलांची टीम तयार झाली. धरमपेठ एज्युकेशन सोसायटी, पर्सिस्टंट फाऊंडेशन यांच्या मदतीने हा संघ उभा झाला. या मुलींना धरमपेठ सायन्स कॉलेजच्या मैदानावर अंध पुरुषांच्या विदर्भाच्या टीमचे कॅप्टन अतुल हारोडे व व्यवस्थापक गोकुळ पारधी यांनी महिनाभर प्रशिक्षण दिले.
स्पर्धेमध्ये राज्यातील पाच टीम सहभागी झाल्या होत्या. विदर्भाचा पहिला सामना एनएससीबी मुंबईसोबत झाला. मुंबईने ८ षटकात ६४ धावा काढल्या. विदर्भाच्या संघाने ६.३ षटकात लक्ष्य पूर्ण केले. यामध्ये मॅन आॅफ दि मॅच ठरलेली आरती अतकरी हिने ४० धावा व कॅप्टन अंकिता शिंदे हिने नॉट आऊट राहून १३ धावा केल्या. नाशिक विरुद्ध दुसरा सामना बरोबरीत सुटला. मात्र रनरेटच्या आधारे विदर्भ संघ विजेता ठरला. पुण्याविरुद्ध अंतिम सामन्यात विदर्भाने ५४ धावांचे लक्ष्य दिले होते. पुण्याच्या संघाने ९ गडी राखून विदर्भाला पराभूत केले. विदर्भाची उपकॅप्टन आरती अतकरी मॅन आॅफ दि सिरिज ठरली.
विदर्भाच्या संघात ५ संपूर्ण दृष्टिहीन (बी-१) व ज्यांना ३ मीटर व ६ मीटरपर्यंत दिसू शकते (बी-२, बी-३) अशा ९ मुली होत्या. यात बी-१ गटातील कॅप्टन अंकिता शिंदे, अंकिता बावने, शालू वाघाडे, वर्षा मेश्राम, पल्लवी धाबार्डे आणि बी-२, बी-३ गटात उपकॅप्टन आरती अतकरी, भारती मावस्कर, प्रांजली आंबेकर, करिश्मा रेहपाडे, शीतल खेकडे, पिंकी ठाकरे, निकिता कन्नाके, पूजा राऊत, प्राजक्ता उके यांचा समावेश होता.
विजेत्या संघाचा धरमपेठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी आत्मदीपक सोसायटीच्या अध्यक्ष जिज्ञासा चवलढाल, प्राचार्य अखिलेश पेशवे, धरमपेठ संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, रत्नाकर केकतपुरे, डॉ. राहुल कलोडे उपस्थित होते.
आम्ही सुरुवातीपासून चांगले खेळलो. संघाची फलंदाजी चांगली होती, परंतु शेवटच्या सामन्यात गोलंदाजी कमी पडल्याने आम्ही सामना हरलो. मात्र कमी सरावात उपविजेता पद पटकाविणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यावर्षीच्या चुकांवर मात करून पुढल्या वर्षी विजेता ठरू.
- अंकिता शिंदे, कॅप्टन
अंधांसाठी पॅरा स्पोर्ट्स डेव्हलपमेंट अॅन्ड ट्रेनिंग सेंटर सुरू करायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अंध मुलांसाठी सर्व खेळ एका मैदानावर खेळता येतील यासाठी आवश्यक ती व्यवस्था शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- जिज्ञासा चवलढाल, अध्यक्ष आत्मदीपक संस्था