नागपुरात दृष्टिहीनांनी केली फलंदाजी अन गोलंदाजीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:26 AM2019-03-31T00:26:42+5:302019-03-31T00:28:12+5:30
पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींनी फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल करीत हा सामना चांगलाच गाजवला. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीमच्या कर्मचाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून या मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींनी फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल करीत हा सामना चांगलाच गाजवला. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीमच्या कर्मचाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून या मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.
डोळ्यात अंधार असला तरी अंतर्मनात असलेला प्रकाश कोणताही आनंद घेण्यासाठी पुरेसा असतो. खेळांच्या माध्यमातून हा आनंद प्रवाहित होत असतो आणि त्यासाठी मग दृष्टीची कमतरता काहीही करण्यापासून रोखू शकत नाही. क्रिकेटच्या सामन्यात ही मुले ही गोष्ट अधोरेखित करीत होते. अर्थातच यामागे दिशा देणारी प्रेरणा महत्त्वाची असते आणि या मुलांसाठी प्रेरणा आहेत आत्मदीपम सोसायटीच्या संचालिका जिज्ञासा चवलढाल. जिज्ञासा स्वत: दृष्टीबाधित आहेत. मात्र त्यांनी संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीनांसाठी प्रकाशाची वाट निर्माण केली आहे. डोळस नसलेल्यांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी क्रिकेटचा सामना हाही एक भाग आहे. त्यांनी आत्मदीपम विदर्भ असोसिएशन ऑफ ब्लाईंड क्रिकेटअंतर्गत एक टीमच तयार केली असून या टीमचे खेळाडू दृष्टिहीनांसाठी होणाऱ्या क्रि केट स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे हा क्रिकेट सामना असून यात पर्सिस्टंट सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावत आहे व हे दुसरे वर्ष आहे. पर्सिस्टंटचे समीर बेंद्रे यांच्या पुढाकाराने हे आयोजन केले जात आहे.
या सामन्यात आत्मदीपमचे १८ खेळाडू आणि पर्सिस्टंटचे २० कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून सहभागी झाले होते. प्रसंगी पट्टी बांधलेल्या कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागत होता, पण विदर्भाच्या ब्लाईंड टीमचे खेळाडू शिताफीने हा खेळ खेळत होते. फलंदाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण आणि स्टम्पच्या मागे असलेल्या खेळाडूंचे कौशल्य थक्क करणारे होते. ही मुले चौकार आणि षटकार मारण्यातही पटाईत असल्याचे जाणवले. प्रत्येक हालचालींवर ‘चीअरअप’ करणाऱ्या टाळ्या व आरोळ्या खेळाचा उत्साह आणखीनच वाढवित होत्या. अर्थातच हा सामना विदर्भ दृष्टिहीन संघानेच जिंकला हे विशेष.