नागपुरात बोट, लाईफ जॅकेट, जवान तयार : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:12 AM2019-07-04T00:12:13+5:302019-07-04T00:13:56+5:30
पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.
२००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरही ही समिती कार्यरत असते. प्राधिकरण हे वर्षभर कार्यरत असते. परंतु मान्सूनच्या काळात विशेष काळजी घेतली जाते. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ एका विभागाचे काम नाही. प्रत्येक विभागाच्या सहकार्याने याचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाचेच यात मोलाचे सहकार्य असते. आपत्तीच्या काळात विभागांचे नेमके नियोजन कसे असावे, यासाठी प्रत्येक विभागातील अधिकऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते. हे प्रशिक्षण पार पडले आहे. यामध्ये आपत्ती आल्यास विभागांनी नेमके काय करवे, त्या-त्या विभागाची काय जबाबदारी राहील, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याकाळात विशेषत: जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. महापालिकेचा अग्निशमन विभाग, रेड क्रॉस सोसायटी आणि एसडीआरएफ यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सध्या ३ बोटी, १५० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बॉय, २२ इन्फाटेबल लाईट ही प्रमुख सामुग्री आहे. यासोबतच आवश्यक इतर लहानसहान वस्तूही आहेत. ही सामुग्री पुरेशी आहे. यासोबतच एसडीआरएफचे (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) १५० जवान तैनात आहेत. एसडीआरएफच्या २२ ते २३ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही टीम अतिशय प्रशिक्षित असल्याने कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यास सज्ज आहे. यासोबतच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचीही एक टीम तैनात राहणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थान केंद्राद्वारे नागपुुरातील विविध शाळांमधील मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास काय करायला हवे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
२४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. ते सातही दिवस २४ तास सुरू राहील. यासाठी तिन्ही पाळ्यातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू राहील. तशी कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ आहे. तर ०७१२-२५६२६६८ हा या नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे. कुठलाही कॉल आला तर संबंधितांना लगेच कळविले जाते. त्यामुळे तातडीने कारवाई शक्य होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.
प्रत्येक तालुकास्तरावर शोध बचाव पथक
प्रत्येक तालुका व महत्त्वाच्या ठिकाणी शोध बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये चांगले पोहता येणारे लोक, होमगार्ड यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० लोकांचे पथक असून गावपातळीवर ५ ते १० जणांचे पथक आहे.