नागपूर शाखेचा सीए अंतिम वर्षाचा निकाल ७.४० टक्के!
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 9, 2024 11:33 PM2024-01-09T23:33:29+5:302024-01-09T23:34:14+5:30
अंतिम परीक्षेत निखिल जसुजा, तर इंटरमिजिएट परीक्षेत जिया माधवानी प्रथम : इंटरमिजिएटचा ७.४२ टक्के निकाल
नागपूर : सीए अंतिम वर्षाची परीक्षा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली. नागपूर शाखेतून अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुपमध्ये बसलेल्या ३७८ विद्यार्थ्यांमधून केवळ २८ विद्यार्थी पास झाले. अर्थात ७.४० टक्के विद्यार्थी सीए झाले. तर इंटरमिजिएट परीक्षेत ५६६ पैकी ४२ विद्यार्थी पास झाले असून त्यांची टक्केवारी ७.४२ एवढी आहे. संपूर्ण देशात दोन्ही ग्रुपचा सीए अंतिम परीक्षेचा निकाल ९.४६ टक्के लागला आहे.
अंतिम परीक्षेत पहिल्या पाचमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निखिल जसुजा (८०० पैकी ५१७ गुण), तहा टोपीवाला (४९९), हिमांशू पचिशिया (४९९), अक्षद अग्रवाल (४८६) आणि इशिका सतीजा (४६८) यांचा समावेश आहे. अंतिम परीक्षेत नागपूर शाखेतून पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये ३७८ विद्यार्थी बसले. त्यात पहिल्या ग्रुपमध्ये ११ आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये ४४ विद्यार्थी पास झाले. तसेच अंतिम परीक्षेत पहिल्या ग्रुपमध्ये ३४८ विद्यार्थी परीक्षेत बसले आणि त्यातील २४ आणि दुसऱ्या ग्रुपमधील ३२० विद्यार्थ्यांपैकी केवळ ६० जणांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
इंटरमिजिएट परीक्षेत नागपूर शाखेत पहिल्या पाचमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकावर जिया माधवानी (५४३), सुजल चटप (५३८), दर्पण लोढा (५३२), सुचित गभणे (५३०) आणि हर्षल पोपटानी (५१५) यांचा समावेश आहे. या परीक्षेत केवळ पहिला ग्रुपची परीक्षा ६९९ विद्यार्थ्यांनी दिली. त्यात ५८ विद्यार्थी पास झाले. तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा ४६२ विद्यार्थ्यांनी दिली आणि १५५ विद्यार्थी पास झाले.