नागपुरात औरंगाबादच्या व्यावसायिकाचे २४ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:29 PM2019-05-10T15:29:46+5:302019-05-10T15:31:17+5:30
औरंगाबाद (बिहार) च्या एका व्यावसायिकाच्या नावाने बनावट धनादेश तयार करून त्या एका टोळीने आधारे पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेतून २३ लाख, ७० हजार रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औरंगाबाद (बिहार) च्या एका व्यावसायिकाच्या नावाने बनावट धनादेश तयार करून त्या एका टोळीने आधारे पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेतून २३ लाख, ७० हजार रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बँकेतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मानकापूर पोलिसांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सागर कोहळे (रा. मानकापूर) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून, अन्य आरोपींमध्ये स्वप्नील सुभाष, श्वेता पुष्पकुमार हजारे, बरबटे आॅटोमोटीव्ह प्रा. लिमिटेड, नितीन नारायण निखाडे, ज्योतीराम देव आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेत आरोपी सागर कोहळे याचे खाते आहे. पीएनबी औरंगाबादचे खातेधारक संजयकुमार सिंग यांचा १२ एप्रिलचा धनादेश १६ एप्रिलला कोहळेने त्याच्या खात्यात जमा केला. २३ लाख, ७० हजारांचा धनादेश असल्यामुळे बँक अधिकारी शितल विनोद खुळसाम (वय ३७) यांनी तो वटविण्यापूर्वी आरोपी सागर कोहळेशी संपर्क केला. त्याने दिलेल्या मोबाईलनंबरवर सिंग यांच्याशी संपर्क केला. दोन्ही कडून ना हरकत मिळाल्याने खुळसाम यांनी ही रक्कम सागर कोहळेच्या खात्यात जमा केली. २५ एप्रिलला पीएनबी औरंगाबादच्या बिहार शाखेकडून मानकापूर बँक शाखेला एक मेल मिळाला. त्यात त्यांचे खातेधारक संजयकुमार सिंग यांच्या खात्यातून २३ लाख, ७० हजारांची रक्कम काढण्यासाठी जी रक्कम काढली गेली तो धनादेश आणि त्यावरच्या सह्या बनावट असल्याचे बिहारमधील बँक अधिका-यांनी कळविले. ज्या क्रमांकाचा धनादेश आहे, तो धनादेशही (ओरिजनल) सिंग यांच्याकडेच आहे, असेही तेथील अधिका-यांनी पीएनबी मानकापूरच्या अधिका-यांना कळविले. त्यामुळे स्थानिक बँकेच्या अधिका-यांची चांगलीच तारांबळ उडाली. बँकेतर्फे शितल खुळसाम यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार दिली. ठाणेदार वजिर शेख यांनी त्याची चौकशी केल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्रीच सागर मोहोळला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
तीन दिवसात पैशाची वाटणी
आरोपी कोहळेच्या खात्यात १६ एप्रिलला रक्कम जमा होताच १६, १७ आणि १८ एप्रिलला त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खात्यात रक्कम वळती करून घेतली. त्यातील सर्वाधिक १० लाखांची रक्कम निखाडे, ५ लाख हजारे, तर उर्वरित रक्कम बरबटे, सुभाष आणि देव यांच्या खात्यात वळती झाली. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही आरोपी बनविले असून, त्यांची या प्रकरणात काय भूमीका आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.