आलिशान कारचे आमिष दाखवून मुंबईच्या ठगबाजाने केली नागपूरच्या व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 09:46 PM2021-12-20T21:46:20+5:302021-12-20T21:46:48+5:30
आलिशान कार कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून एका ठगबाजाने नागपुरातील एका व्यापाऱ्याला २६ लाखांचा गंडा घातला. अर्जुन अय्यर असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईत राहातो.
नागपूर - आलिशान कार कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून एका ठगबाजाने नागपुरातील एका व्यापाऱ्याला २६ लाखांचा गंडा घातला. अर्जुन अय्यर असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईत राहातो.
गांधीबागमधील कपड्याचे ठोक व्यापारी चिराग सुरेश केवलरामानी (वय २८) यांची २८ जूनला आरोपी अय्यरसोबत सोशल मिडियावर ओळख झाली. सेलिब्रेटींच्या महागड्या आलिशान कार तसेच कंपनीच्या नव्या कार सेटिंग असल्यामुळे आपण कमी किंमतीत उपलब्ध करून देतो, अशी थाप अय्यरने केवलरामानींसोबत संपर्क झाल्यावर मारली होती. तो तसे फोटोही इस्टाग्रामवर अपलोड करत होता. ३५ लाख रुपये किंमत असलेली एक लक्झरी कार केवलरामानीने पसंत केली. कंपनीतून ही कार केवळ २६ लाखांत मिळेल. कारची डिलीवरी मिळाल्यानंतर आपल्याला दोन लाख रुपये कमिशन द्यावे लागेल, असेही अय्यर म्हणाला. ते मान्य करून केवलरामानीने जुलै महिन्यात अनेकदा कारची मागणी केली. सध्या ते मॉडेल उपलब्ध नाही, अशी थाप मारून अनेक दिवस टाळल्यानंतर आरोपी अय्यरने जुलै अखेरीस केवलरामानी यांना फोन करून आपल्या बँक खात्यात २१ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. केवलरामानीने तसेच केले. चार पाच दिवस होऊनही कार मिळाली नसल्याने केवलरामानी यांनी आरोपीशी संपर्क केला. तेव्हा त्याने केवलरामानी यांना पाच लाख रुपये मुंबईल घेऊन या, कंपनीत जमा करायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार, केवलरामानी मुंबईत गेले आणि पाच लाख रुपये अय्यरला दिले. दोन चार दिवसांत कार नागपुरात पोहचून जाईल, अशी थाप मारून आरोपीने त्यांना नागपुरात परत पाठविले.
धनादेश दिले ते वटलेच नाही
केवलरामानी यांना शंका आल्यामुळे त्यांनी अय्यरला आपली रक्कम परत मागितली. त्यावर अय्यरने त्यांना धनादेश दिले. त्या खात्यात रक्कमच नसल्याने ते वटले नाही. नंतर आरोपीने संपर्कही तोडला. त्यामुळे केवलरामानी यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांनी तपास केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात आरोपी अय्यरविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----