नागपूर होऊ शकते प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:17 AM2018-09-22T11:17:39+5:302018-09-22T11:18:13+5:30
नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरे हा सुद्धा या भूमीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. या मंदिरांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन झाल्यास मंदिर पर्यटनाचे हब होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.
सविता देव हरकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ही व्याघ्र राजधानी समजली जाते. देशविदेशातील पर्यटक केवळ व्याघ्र दर्शनासाठी येथे येतात. परंतु वाघांशिवाय नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरे हा सुद्धा या भूमीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. या मंदिरांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन झाल्यास मंदिर पर्यटनाचे हब होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.
विदर्भातील प्राचीन मंदिरे आणि प्रामुख्याने भोसलेकालीन मंदिरांच्या स्थापत्यकलेचा अभ्यास व संशोधन करण्याकरिता अमेरिकेच्या वरिष्ठ संशोधक कॅथलिन कमिग्ज सध्या शहरात आल्या आहेत. येथील मंदिराचे देखणेपण बघून त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. गेल्या आठवडा भरात त्यांनी नवी शुक्रवारीतील काशीबाई मंदिरासह बहुतांश प्राचीन मंदिरांचा दौरा केला तेव्हा एकेकाळी ही मंदिरे म्हणजे केवढे मोठे वैभव होते याची प्रचिती त्यांना आली. ही मंदिरे प्राचीन कलाकृती आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशेषत: काशीबाई मंदिराच्या रचनेने त्या फारच प्रभावित झाल्या. मुळात हे मंदिर म्हणजे भोसलेकालीन स्मशानभूमी आहे. येथेच पहिले राजे रघुजी यांची समाधी आहे.
कॅथलिन या बर्मिंगहम येथील द युनिव्हर्सिटी आॅफ अल्बामामध्ये कला आणि कला इतिहास या विषयाच्या सहयोगी अधिव्याख्याता आहेत. प्राचीन इतिहास आणि स्थापत्यकलेच्या संशोधक असलेल्या कॅथलिन यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर इंडियन स्टडीज या संस्थेची फेलोशिप आहे. ही संस्था भारतातील १३०० वर्षांपूर्वीची मंदिरे आणि प्रामुख्याने प्राचीन हिंदू मंदिरांच्या स्थापत्यकलेला अभ्यास करते आहे. भोसलेकालीन मंदिरांची स्थापत्यकला हा त्यातील फार मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. भोसल्यांचे अस्तित्व छत्तीसगड, मध्य प्रदेश, निजामापासून अगदी ओडिशा, उत्तर प्रदेशपर्यंत होते. गंगेवर भोसल्यांचा घाट आहे. मराठा राजकारण आणि पेशव्यांचा अभ्यास करीत असताना कॅथलिन यांना व्हर्जिनिअन म्युझिअम आॅफ फाईन आर्टमध्ये १८ व्या शतकातील ज्ञानेश्वरीसह इतर काही चित्रे अर्धवट अवस्थेत दिसली. उत्सुकतेपोटी खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्राचीन काळात नागपूर हे मिनिएचर मॅनस्क्रिप्ट पेंटिंगचे फार मोठे केंद्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चित्रांची देखभाल न झाल्याने ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेली होती. सर्वप्रथम या चित्रांच्या मुळापर्यंत पोहोचण्याची ओढ त्यांना नागपूरला घेऊन आली आणि त्यातूनच पुढे येथील मंदिरांच्या स्थापत्यकलेचे अध्ययन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. नागपूरचा हा त्यांचा चौथा दौरा आहे. मार्कंडा, रामटेक, धापेवाडा, आदासासह विदर्भातील बहुतांश मंदिरांना त्यांनी भेट दिल्या आहेत.
या मंदिरांचे सौंदर्य बघून त्या प्रचंड भारावल्या. अनेक मंदिरे अप्रतिमच आहेत. वाड्यातील (महाल) कल्याणेश्वर, पाताळेश्वर, नागेश्वर, राजराजेश्वर तसेच रुक्मिणी मंदिराचे स्थापत्य अद्भूत आहे. शुक्रवारी तलावाच्या आग्नेय दिशेला असलेले विश्वेश्वर मंदिर हे तर उच्चकोटीच्या पाषाण कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे, असे त्या म्हणतात. भोसल्यांच्या मंदिरांचे एक वैशिष्ट्य हे की भोसलेंचा प्रदेश फार दूरवर पसरला होता. त्याची छाप येथील मंदिरांच्या कलाकृतींवर स्पष्टपणे जाणवते. सव्वाशे वर्षे राज्य करणाऱ्या भोसलेंनी एकट्या नागपूर शहरात शेकडो मंदिरांची निर्मिती केली. त्यापैकी काही दुरवस्था आणि देखभालीअभावी काळाच्या पडद्याआड गेली. परंतु काही मंदिरे काळाचा आघात सहन करीत आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्या कलाकृती झिजल्या असल्या तरी जे काही नक्षीकाम शिल्लक आहे त्यावरून त्यांचे सौंदर्य लक्षात येते. अनेक मंदिरे पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत येत नसून खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न आहे. अनेक मंदिरे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत. काही जीर्णावस्थेत आहेत.
राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंदिर पर्यटनाचा जसा विकास झाला तसाच येथेही होऊ शकतो. गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची, असे कॅथलिन यांना वाटते. ही मंदिरे आज कुणा एकाच्या मालकीची नसली तरी मनपा स्तरावर त्यांच्या संवर्धनाची काळजी घेतली जाऊ शकते, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. प्राचीन मंदिरांच्या रुपातील हा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. यादृष्टीने नागपूरकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.