नागपूरच्या क्रेझी कॅसलची लीज रद्द ; महामेट्रोचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:13 PM2018-05-15T22:13:00+5:302018-05-15T22:21:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान मुलांची पसंती असलेल्या क्रेझी कॅसलची लीज रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या जागेवर मेट्रो रेल्वेचे स्टेशन प्रस्तावित आहे. नागपूर शहराची ओळख बनलेला वॉटर पार्क क्रेझी कॅसल आता इतिहासजमा होणार आहे.
अंबाझरी उद्यानाच्या समोरील क्रेझी कॅसल महमेट्रोच्या प्रकल्पासाठी अधिग्रहीत क रण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला गरज असेल तितकीच जागा महामेट्रो अधिग्रहित करणार होती. परंतु नंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथील संपूर्ण ६.७ एकर जागा महामेट्रोला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नासुप्रने लीज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रेझी कॅसलचे संचालन करणाऱ्या हल्दीराम समूहालाही जागेचा ताबा सोडण्यास सांगितले होते. नासुप्रने ही जागा हल्दीराम यांना लीजवर दिली आहे. २०२१ पर्यत या जागेची लीज आहे. मेट्रो प्रकल्पासाठी ही जागा तात्काळ खाली करण्याची गरज आहे. त्यानुसार विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निर्धारित कालावधीपूर्वी लीज रद्द करण्यात आल्याने नासुप्रला मोबदला द्यावा लागणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त अनुप कु मार यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय समिती निर्णय घेणार आहे. के्रझी कॅसलच्या संचालकांनी १६२ कोटींची नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती आहे. समितीच्या निर्णयानंतर नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होण्याची शक्यता आहे.
आता मेट्रोला काम करणे शक्य
सुरुवातील मेट्रो रेल्वे प्रकल्प व क्रेझी कॅसल दोन्ही सुरू ठेवण्याचा विचार होता. परंतु यात यश आले नाही. त्यामुळे अखेर के्रझी कॅसलची संपूर्ण जागा मेट्रोला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता मेट्रोेला काम करणे शक्य होणार आहे.