नागपुरातील कॅन्सर हॉस्पिटलचा प्रकल्प रद्द; सरकार निधीच देईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 07:47 PM2022-06-21T19:47:06+5:302022-06-21T19:49:30+5:30
Nagpur News नागपुरात प्रस्तावित कॅन्सर हॉस्पीटलसाठी २० कोटींचा निधी न मिळाल्याने एमएमआरडीने हा प्रकल्पच रद्द केला आहे.
नागपूर : मेडिकलच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामासाठी सरकारने मार्च २०१९ रोजी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली. बांधकामाची जबाबदारी असलेल्या ‘एनएमआरडी’ने निविदा प्रक्रिया पूर्ण केली; परंतु सरकारकडून पहिल्या टप्प्यातील २०कोटींचा निधीच मिळाला नसल्याने एमएमआरडीने हा प्रकल्पच रद्द केला. कॅन्सर रुग्णांच्या वेदनेचे सरकारला सोयरसुतकच नसल्याचे म्हणण्याची वेळ कॅन्सर रुग्णांवर आली आहे.
कॅन्सर रुग्णांच्या संख्येत राज्यात मुंबईनंतर नागपूरचा क्रमांक लागतो. हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने विदर्भच नाही, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश येथून उपचारासाठी रुग्ण येतात. विशेष म्हणजे, पुणे, मुंबई, नाशिकच्या तुलनेत येथे येणारा रुग्ण गरीब आहे. त्याला खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेणे परवडणारे नाही. परिणामी, नागपुरात ‘कॅन्सर हॉस्पिटल’ उभारण्यासाठी २०१२ मध्ये कॅन्सरग्रस्तांनी आंदोलन केले. त्यावेळी हिवाळी अधिवेशनात कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा झाली; परंतु पाच वर्षे होऊनही पुढे काहीच झाले नाही. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या यावरील जनहित याचिकेवर जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देश दिले; परंतु अद्यापही हे हॉस्पिटल हवेतच आहे. दरम्यानच्या काळात सरकारने बांधकामासाठी ७६ कोटींना प्रशासकीय मंजुरी दिली, तर यंत्र खरेदीसाठी २३ कोटी रुपयांचा निधी खात्यात जमाही केला. ‘लोकमत’ने याचा पाठपुरावाही केला. यामुळे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडी) २२ डिसेंबर २०२१ पासून निविदा मागविल्या. ही प्रक्रिया पूर्ण झाली असताना ‘एनएमआरडी’ने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पहिल्या टप्प्यात २०कोटींची मागणी केली; परंतु निधीच उपलब्ध झाला नसल्याचे ‘एनएमआरडी’चे म्हणणे आहे.
११० बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलवर फेरले पाणी
:: टीबी वॉर्ड परिसरात होणाऱ्या ११० बेडच्या या हॉस्पिटलची इमारत तळमजल्यासह तीन मजल्याची होणार होती. यात तळमजल्यावर रेडिओथेरपी विभाग, दोन ‘लीनिअर एक्सिलरेटर’ यंत्र शिवाय पॅथोलॉजी विभाग, मायनर ओटी, कार्यालयीन कक्ष होणार होते.
:: पहिल्या मजल्यावर रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिसिन ऑन्कोलॉजी, सर्जरी ऑन्कोलॉजी व पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व ‘डे-केअर’ सेंटर होणार होते.
:: दुसऱ्या मजल्यावर : ‘एसआयसीयू’ व ‘एमआयसीयू’ होणार होते. शिवाय, चार शस्त्रक्रिया गृह होणार होते.
:: तर, तिसऱ्या मजल्यावर जनरल वॉर्ड, मेडिसिन वॉर्ड व सर्जिकल वॉर्ड होणार होते; परंतु सरकारने निधीच दिला नसल्याने व एनएमआरडीने हात वर केल्याने या हॉस्पिटलवर पाणी फेरले आहे.
-निधीच मिळाला नसल्याने कॅन्सर हॉस्पिटल रद्द
मेडिकलमधील कॅन्सर हॉस्पिटलच्या बांधकामासाठी तीन वर्षांपासून निधीची मागणी केली जात आहे. मागील वर्षी बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीही निधीची मागणी केली. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाने निधी देण्याची हमी दिली; परंतु निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही निधी मिळाला नाही. यामुळे कॅन्सर हॉस्पिटलचा प्रकल्प रद्द करण्यात आला. याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे.
-लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता, एनएमआरडी.