आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबच संपले; आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 04:55 PM2022-07-28T16:55:18+5:302022-07-28T16:59:23+5:30
नागपूरातील कार जळीतकांड प्रकरणातील व्यावसायिक भट यांच्या मुलाचेदेखील निधन
नागपूर : आर्थिक विवंचनेमुळे स्वत: ला कारमध्ये जाळून घेणाऱ्या उद्योजक रामराज भट यांच्या पत्नीनंतर आता मुलगा नंदन याचे देखील निधन झाले आहे. आईवडिलांचा अशाप्रकारे अंत झाल्याने त्याला प्रचंड धक्का बसला होता व ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबाचा अशाप्रकारे अंत झाल्याने नातेवाईक शोकाकुल झाले आहे. या प्रकरणात दोष कुणाचा होता व याची जबरी शिक्षा कुणाला मिळाली असाच सवाल व्यक्त करण्यात येत आहे.
रामराज भट यांचे व्यवसायात खूप नुकसान झाले होते. आर्थिक कोंडीमुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. आर्थिक विवंचनेतून भट यांनी स्वत: सह कुटुंबीयांना संपविण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील द्रव पदार्थ तिघांवरही फवारला आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वी त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले ; परंतु आई व मुलगा जखमी झाले. तर वडिलांचा मात्र मृत्यू झाला. त्यांच्या सुसाईड नोट वरून कारणाचा खुलासा झाला.
संगीता या हल्ल्यात ६० टक्क्यांहून अधिक भाजल्या होत्या. २४ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दिवसांच्या अंतराने वडील व आई गमावल्याने नंदनला मोठा धक्का बसला होता. त्याची प्रकृती आणखी खालावत गेली व मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले, अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी दिली.
वडिलांच्या हट्टामुळे नंदनचे स्वप्न भंगले
दरम्यान, नंदनच्या बयाणातून मोठा खुलासा झाला आहे. त्याचे वडील २०१४ पर्यंत एका कंपनीचे वर्कशॉप चालवत होते. मात्र त्यानंतर ते घरीच होते. नंदन हा बी.ई. झाला होता व त्याला नोकरीत अजिबात रस नव्हता. त्याला स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र त्याचे वडील नोकरीसाठी दबाव टाकत होते. नंदन युट्यूब वरील व्हिडीओ पाहून ऑनलाईन स्टॉक मार्केटचे धडे घेत होता. परंतु त्याच्या वडिलांच्या आत्मघातकी पावलामुळे त्याचे स्वप्न नेहमीसाठीच भंगले.
नंदनच्या बयाणाच्या आधारावरच वडिलांवर हत्येचा गुन्हा
भट यांची पत्नी व मुलगा यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचे बयाण घेणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. संगीता यांचा मृत्यू झाल्याने नंदनच्या बयाणावरच अनेक गोष्टी अवलंबून होत्या. बेलतरोडी पोलिसांनी अखेर त्याचे बयाण घेतले. वडील असे काही पाऊल उचलतील याची काहीच कल्पना नव्हती, असे त्याने सांगितले होते. त्याच्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी रामराज भट यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला होता.